ठाणे : वडाळा ते कासारवडली मेट्रोला मुख्यमंत्र्यांनी ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्या कामाला वेग येण्याची चिन्हे आहेत. ठाण्यातील १२ जंक्शनवरुन सुमारे २०० वातानुकूलीत बसमधून जेवढे प्रवासी जाऊ शकतात तेवढीच वाहतूक क्षमता वडाळा- ठाणे या मेट्रो सेवेची असेल आणि दररोज गर्दीच्या वेळांमध्ये सुमारे ४० हजार प्रवासी त्यातून प्रवास करतील, असा अंदाज दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनच्या अभ्यासामधून व्यक्त करण्यात आला आहे. या मेट्रो लिंकमुळे ठाण्यातील प्रवाशांचा मुंबईकडील प्रवास अधिक वेगवान होणार आहे. एवढे प्रवासी कमी झाल्याने शहरातील वाहतुकीवरील ताणही कमी होण्याची चिन्हे आहेत.अनेक वर्षे कागदावर राहिलेल्या आणि खर्चाच्या मुद्यावरुन गटांगळ्या खात असलेल्या ठाणे मेट्रोला मुख्यमंत्र्यानी नुकताच हिरवा कंदील दाखवला. ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येसाठी स्थानिक वाहतूक व्यवस्था कुचकामी ठरल्याने सर्व आशा मेट्रोवर आहेत. दिल्ली मेट्रो कॉर्पोरेशनने या मार्गाचा अभ्यास केला असून नुकतेच त्याचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांसमोर झाले. ठाण्यासाठी मेट्रोची आवश्यकता आणि वाढते प्रवासी यांचा अभ्यास केल्यानंतर हाती आलेल्या आकडेवारीनुसार येत्या १० वर्षात शहरातील १२ प्रस्तावित मेट्रो जंक्शनवरील प्रवासी संख्येत तिप्पट वाढ होईल. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, विशेषत: माजिवड्याच्या पुढे राहणाऱ्यांसाठी हा प्रकल्प अत्यावश्यक आहे. कारण येथून कामासाठी मुंबईला जाणाऱ्यांसाठी कोणतीही वेगवान वाहतूक सेवा उपलब्ध नाही. सध्या येथून घोडबंदर मार्गे मुंबईकडे जा-ये करताना एका दिशेच्या प्रवासासाठी सुमारे दोन तास लागतात. २०२१ आणि २०३१ या दहा वर्षांत गर्दीच्या वेळी ठाण्यात कोणत्याही दिशेकडे मेट्रोमधून प्रवास करू शकणाऱ्या संभाव्य प्रवासी संख्येची आकडेवारीही या अभ्यासातून समोर आली. त्यानुसार २०३१ पर्यंत सुमारे ४० हजार प्रवाशी यातून प्रवास करु शकतील.
ठाणे मेट्रोतून जाणार ४० हजार प्रवासी
By admin | Published: June 08, 2016 4:57 AM