लोकमत न्यूज नेटवर्कसोलापूर : ‘जलयुक्त शिवार’ नंतर राज्य सरकारने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना हाती घेतली असून त्यातून राज्यातील ४० हजार तलाव गाळमुक्त होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुख्यमंत्री बुधवारी सांगोला आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी करण्यासाठी आले होते. सांगोला दौऱ्यात त्यांनी मानेगाव येथे तर दक्षिण सोलापूर तालुक्यात नांदणी, मंद्रुप येथे जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची पाहणी केली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, यांच्यासह आमदार, वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जलयुक्त शिवार योजना आता सरकारची राहिली नसून ती लोकचळचळ बनली आहे. या योजनेतून १२ लाख हेक्टर क्षेत्र संरक्षित सिंचनाखाली आले आहे. त्यालाच पूरक या योजनेमधून तलाव गाळमुक्त केले जातील. गाळामुळे शेतीची सुपिकता वाढेल आणि पाणी साठवण क्षमताही वाढेल, असे फडणवीस यांनी सांगितले. सांगोला तालुका दुष्काळी असल्याने या भागातील लोकांना जलसंधारणाचे महत्त्व पटले आहे. मानेगावमध्ये ११०० हेक्टरपैकी ८० टक्के हेक्टरवर कंपार्टमेंट बंडिंंगची चांगली कामे झाली आहेत. उर्वरित २० टक्के हेक्टर क्षेत्रावरही चांगली कामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. सोलापूर जिल्ह्यात गतवर्षी जलयुक्त शिवारची चांगली कामे झाल्याने पुरस्कार मिळाला आहे. याहीवर्षी त्याचधर्तीवर जलसंधारणाच्या कामाचे उद्दिष्ट पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.फडणवीस यांनी मानेगाव येथील पंतप्रधान आवास घरकुल योजनेतून लाभार्थी विठ्ठल मनगिनी भंडगे यांनी बांधलेले घरकुल व प्रगतीपथावर असलेल्या घरकुलाची देखील पाहणी केली.
राज्यातील ४० हजार तलाव गाळमुक्त करणार
By admin | Published: May 25, 2017 1:57 AM