पुणे : राज्यातील प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या सुमारे १ लाख ५७ हजार जागांवर प्रवेशासाठी सुमारे १ लाख १४ हजार अर्ज अंतिम झाले आहेत. त्यामुळे यंदाही अभियांत्रिकीच्या ४० हजारांहून अधिक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे; मात्र मागील वर्षीच्या तुलनेत यंदा अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. राज्यातील शासकीय, खासगी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी ‘एमएचटी-सीईटी’ घेण्यात आली. ही सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या यंदा तुलनेने वाढली होती. सुमारे २ लाख ६० हजार विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरले. त्यामुळे यावर्षी अभियांत्रिकी प्रवेशासाठी मोठी स्पर्धा वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांकडून आॅनलाइन अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया गुरुवारी संपली. सुमारे १ लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी आॅनलाइन नोंदणी केली. शुक्रवारपर्यंत या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश अर्ज अंतिम करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. ‘या मुदतीत सुमारे १ लाख ५७ हजार जागांसाठी सुमारे १ लाख १४ हजार विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम झाले आहेत. प्रवेशक्षमतेत बदल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती राज्याचे तंत्र शिक्षण संचालक डॉ. सुभाष महाजन यांनी दिली.दरम्यान, यावर्षी मागील वर्षीच्या तुलनेत अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही प्रमाणात वाढली आहे. मागील वर्षी सुमारे १ लाख ७ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. यावर्षी हे प्रमाण सुमारे ७ हजारांनी वाढले आहे. तसेच, मागील वर्षीची प्रवेशक्षमताही सुमारे १ लाख ६४ हजार एवढी होती. त्यामुळे रिक्त जागांची संख्या ६० हजारांहून अधिक होती. यावर्षी तुलनेने प्रवेशक्षमता कमी असून, प्रवेश अर्ज वाढले आहेत. त्यामुळे यंदा रिक्त जागांचे प्रमाण दरवर्षीपेक्षा कमी राहणार आहे. - तंत्र शिक्षण संचालनालयाने राज्यातील अभियांत्रिकी शिक्षण देणाऱ्या संस्थांची पाहणी केली होती. या पाहणीमध्ये काही संस्थांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा आढळून आल्या नाहीत. तसेच प्राचार्य, प्राध्यापकांची पदेही रिक्त आढळून आली. अशा संस्थांचा अहवाला अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेकडे (एआयसीटीई) पाठविण्यात आला होता. परिषदेने संबंधित संस्थांची मान्यता रद्द केली आहे. तसेच काही संस्थांनी इलेक्टॉनिक्स अॅन्ड टेली कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाला कमी प्रवेश होत असल्याने जागा सरेंडर केल्या. त्यामुळे यावर्षीच्या प्रवेश क्षमतेत घट झाली आहे. अद्याप ही प्रक्रिया सुरू असल्याने प्रवेशक्षमता आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
यंदा अभियांत्रिकीच्या ४० हजार जागा रिक्त?
By admin | Published: June 18, 2016 3:25 AM