नवी दिल्ली : कोरोनामुळे वाहतूक बंद झाल्याने मालवाहू जहाजे व पर्यटनासाठीच्या क्रुझशिपवर काम करणारे भारतातील चालक, कर्मचारी व खलाशी असे सुमारे ४० हजार जण जगाच्या विविध समुद्रांमध्ये नांगर टाकून उभ्या असलेल्या जहाजांवर अडकून पडले आहेत. यापैकी १५ हजार चालक, कर्मचारी व खलाशी सुमारे ५०० मालवाहू जहाजांवर तर आणखी २५ हजार क्रुझशिपवर आहेत.
घरीही परत येता येत नसल्याने त्यांची कोंडी झाली आहे. या दर्यावर्दी कर्मचाऱ्यांच्या ‘एनयूएसआय’, ‘एमयूआय’ व ‘एमएएसएसए’ इत्यादी संघटनांनी नौकानयन मंत्रालयाकडे हा प्रश्न मांडला असून, सध्याचा ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतर त्यांना मदत करण्याचे आश्वासन सरकारने त्यांना दिले आहे.
‘मारिटाइम असोसिएशन आॅफ शिपओनर्स, शिपमॅनेजर्स अॅण्ड एजन्ट््स’चे (एमए एसएसए) कार्यकारी अधिकारी कॅप्टन शिव हळबे यांनी सांगितले की, जहाजांवर अडकून पडलेल्या या सुमारे ४० हजार कर्मचाऱ्यांची नोकºयांची कंत्राटे संपली आहेत. ते म्हणाले की, या लोकांची समस्या आम्ही नौकानयनमंत्री मनसुखलाल मांडविया यांच्यापुढे मांडली. ‘लॉकडाऊन’ संपल्यावर या लोकांना मायदेशी परत आणण्याची व्यवस्था करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. मात्र परत आल्यावर या लोकांच्या चाचण्या घेऊन त्यानुसार त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवावे लागेल.
‘नॅशनल युनियन आॅफ सीफेअर्स आॅफ इंडिया’चे (एनयूएसआय) सरचिटणीस अब्दुलगनी सारंग यांंनी सांगितले की, कोरोना संकटामुळे भारतीय अर्थव्यवस्था सध्या अडचणीत असताना आमची संघटना जहाज कर्मचाºयांना आर्थिक मदत देण्याच्या दृष्टीने जेवढे काही करता येईल तेवढे नक्कीच करेल. संघटनेने १० कोटी रुपयांचा निधी बाजूला काढून ठेवला आहे, असेही त्यांनी सांगितले.गोमंतकीय ८००० खलाशी अडचणीतसुशांत कुंकळयेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव : विदेशात अडकलेल्या गोव्यातील सुमारे ८ हजार खलाशांच्या कुटुंबीयांचे धाबे दणाणले आहेत. एकट्या मियामी शहरातच सुमारे ४ हजार गोमंतकीय अडकले असून, त्यांना लवकर तिथून बाहेर काढा यासाठी गोवा सरकारवर दबाव आणला जात आहे. जगातील एकूण खलाशाांमध्ये भारतीय ४३ टक्के असून या भारतीयांमध्ये ७० टक्के प्रमाण गोवेकारांचे आहे. अजूनही सुमारे ८००० गोवेकर खलाशी एकतर बोटीवर किंवा विदेशी भूमीवरील हॉटेलात अडकून पडले आहेत. गोअन सीफेअर्स असोसिएशन आॅफ इंडिया या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डिक्सन वाझ म्हणाले, एका मियामी शहरातच ५ बड्या कंपन्यांची जहाजे अडकली असून त्यात अडकलेल्या भारतीयांची संख्या १३ हजारांच्या आसपास असावी. त्यातील सुमारे ४००० गोवेकर आहेत.