डहाणू : विजेची अव्वाच्या सव्वा बिले पाठवून ती सक्तीने वसूल करणाऱ्या महावितरणच्या गलथान कारभारामुळे डहाणूच्या किनारपट्टीतील भागांतील चाळीस गावे गेल्या दोन दिवसांपासून अंधारात खितपत पडली असून येथील ग्राहकांच्या सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या वीज महावितरणच्या कारभाराविरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.या भागात गेल्या शुक्रवारपासून धो-धो पाऊस कोसळत असल्यामुळे येथील लोकांचे जनजीवन अस्ताव्यस्त झालेले असतानाच त्यात भर म्हणून गेल्या दोन दिवसांपासून येथील वीज बेपत्ता आहे. बहाड, बाबला तलाव तसेच बोईसर येथील ३३ के.व्ही. केंद्रात तांत्रिक बिघाड झाल्याने आज शनिवारी पहाटे चार वाजता वीजपुरवठा खंडीत झाला. मात्र १५ तासानंतर वरोर, वानगांव, फीडर सुरू झाले. परंतु रात्री आठ वाजले तरी चिंचणी फीडर सुरू न झाल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड चिड निर्माण होऊन सर्वत्र महावितरणच्या विरोधात आंदोलन उभारण्याची चर्चा सुरू झाली असून नागरिकांच्या संतापाचा कधीही उद्रेक होऊ शकतो.दरम्यान वीज नसल्यामुळे गेल्या तीन चार दिवसांपासून पिण्याचे पाणी येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये कमालीचा प्रक्षोभ निर्माण झाला आहे. (वार्ताहर)
डहाणू किनारपट्टीतील ४० गावे २ दिवस अंधारात
By admin | Published: September 18, 2016 2:02 AM