लोणार (जि. बुलडाणा): बँकिंग व्यवहाराकरिता अनिवार्य असलेले स्टेट बँकेचे ४00 एटीएम कार्ड शहराबाहेरील मोठा मारोती मंदिर संस्थानच्या समोरील शेतात दगडाखाली फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने पोस्टाचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. स्थानिक स्टेट बँकेच्या शाखेतून एटीएमच्या साहाय्याने बँकिंग व्यवहार होत असल्यामुळे खात्यातून रक्कम काढायची किंवा जमा करायची असेल, तसेच रक्कम कुणाला पाठवायची असेल तर एटीएम कार्डचा मोठय़ा प्रमाणात वापर होतो. बँकिंग व्यवहारात सुसूत्रता आणण्याकरिता बँकेतील प्रत्येक खातेदाराला एटीएम कार्ड वितरित करण्याकरिता पोस्ट ऑफीस कार्यालयाला दिले जातात. एटीएम कार्ड मिळाले नसल्यामुळे ग्राहकांच्या बँकेत एटीएम कार्डकरिता वार्याही सुरू होतात. असे असतानाही डिसेंबर २0१४ महिन्यातील जवळपास ४00 एटीएम कार्ड शहरापासून १ कि.मी. अंतरावरील मोठा मारोती मंदिर संस्थानच्या शेतातील दगडाखाली फेकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती स्टेट बँक प्रशासनाला समजली. सदर गंभीर प्रकाराची शहानिशा करून घेण्यासाठी बँक व्यवस्थापकांनी बँकेचे दोन कर्मचारी दर्शन शर्मा व नारायण आढाव यांना घटनास्थळी पाठवले असता, त्या ठिकाणी बँकेचे जवळपास ४00 एटीएम कार्ड पडलेल्या अवस्थेत आढळून आले. यामुळे पोस्ट ऑफीसचा भोंगळ कारभार उघडकीस आला.एटीएमसाठी मोजावे लागतात ४00 रु.बँकेतील खातेधारकाला एकदा एटीएम कार्ड वितरित केल्यावर त्या खातेधारकाला आपले एटीएम कार्ड हरविले तर परत एटीएम कार्ड काढण्याकरिता ४00 रुपयांचा भुर्दंंड सहन करावा लागतो. एटीएम कार्ड वितरित करताना एखाद्याचा पत्ता पोस्ट ऑफीसला न मिळाल्यास पोस्ट ऑफीसकडून सदर एटीएम कार्ड बँक प्रशासनाच्या स्वाधीन करण्याचा नियम आहे, हे विशेष.
ग्राहकांचे ४00 एटीएम कार्ड फेकले उकिरड्यावर!
By admin | Published: July 06, 2016 1:31 AM