नागपूर : देशभर बनावट कंपन्या स्थापन करून त्यांच्या माध्यमातून सुमारे तीन हजार कोटी रुपयांची ‘लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स’ची चोरी केली गेली असल्याची आयकर विभागाचा संशय असून विभागाने राज्याच्या नागपूर, औरंगाबाद व नाशिक विभागांमध्ये अशा प्रकारची २०० प्रकरणे शोधून काढली असून त्यात सुमारे ४०० कोटी रुपयांचा कर बुडविला गेल्याचे उघड झाले आहे.आयकर विभातील सूत्रांनी ही माहिती देताना सांगितले की, आयकर विभागाच्या अन्वेषण शाखेच्या (सीआयटी) यादीत अशा पद्धतीने काळा पैसा पांढरा करणाऱ्या नागपुरातील १०० नावांचा समावेश आहे. सध्या दोन व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. ही प्रकरणे सुमारे १४ कोटींची आहेत. अशा प्रकरणांमध्ये आता धाडसत्र सुरू केले जाईल. नागपुरातील बरेच नेते, चार्टर्ड अकाऊंटंट, डॉक्टर, उद्योगपती, ज्वेलर, ट्रेडर आदींचे नावे या यादीत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने स्थापन केलेले विशेष तपासी पथक (एसआयटी), ‘सेबी’चे अधिकारी व आयकर विभागाचे अधिकारी हे परस्परांच्या समन्वयाने या प्रकरणांचा देशव्यापी तपास करीत आहेत. काळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा करणाऱ्या या लोकांकडून सुमारे ३० हजार कोटी रुपयांची करवसुली केली जाऊ शकेल, असा अंदाज आहे.तपास जोरात सुरु असून कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी खात्रीही या सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)कशी आहे कार्यपद्धती ?आयकर विभागातील अधिकाऱ्यांच्या मते, या गोरखधंद्यात सामील असलेल्या सर्व कंपन्या कोलकाता येथे नोंदणीकृत आहेत. यांची संख्या सुमारे ५००० आहे. या कंपन्या फक्त कागदावर असून यांचे कुठेही कार्यालय नाही व एकही कंपनी कार्यरत नाही. केवळ ‘लाँग टर्म कॅपिटल गेन टॅक्स’च्या माध्यमातून करचोरी करण्यासाठी या कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत.या कंपन्या केवळ कागदावर असल्या तरी त्यांचे बनावट ताळेबंद आणि संचालक मंडळ बैठकींची कार्यवृत्ते मात्र रजिस्ट्रार आॅफ कंपनीज कार्यालयाकडे नियमितपणे सादर केली जात असतात. या कंपन्या विविध कंपन्यांचे शेअर पडेल भावाने खरेदी करतात व त्यांचे दर मुद्दाम चढवून नंतर ते विकले जातात. संशयावरून अशा काही कंपन्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली असता हा घोटाळा उघड झाला. नंतर सर्वेक्षण करून बनावट कंपन्या शोधण्यात आल्या.
राज्यात तीन शहरांत ४०० कोटींची करचोरी
By admin | Published: August 27, 2015 2:31 AM