विधानसभेच्या ४००, लोकसभेच्या १०० जागा कराव्या लागणार; वडेट्टीवारांचा शिंदे-फडणवीस-पवारांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 05:05 PM2023-07-07T17:05:33+5:302023-07-07T17:06:23+5:30
काँग्रेस फुटणार हे बिनबुडाचं आहे. त्यात काही ही तथ्य नाही. अफवा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
वंचितला सोबत घेण्यावरून महाविकास आघाडीत मतमतांतरे होती. उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती केल्याने मविआच्या नेत्यांमध्ये नाराजी होती. परंतू, अजित पवार शिंदे-भाजपसोबत गेल्याने मविआला आता वंचित सारख्या समविचारी पक्षांशी मोट बांधणे गरजेचे वाटू लागले आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी हे वक्तव्य केले आहे.
काँग्रेस फुटणार हे बिनबुडाचं आहे. त्यात काही ही तथ्य नाही. अफवा आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. याचबरोबर पंकजा मुंडे मोठ्या नेत्या आहेत, त्यांचे आम्ही काँग्रेसमध्ये स्वागत करु. त्या आल्यावर आम्हाला फायदा होईल. त्या लोकप्रिय नेत्या आहेत. त्यांना समाजाचा पाठिंबा आहे. मराठवाड्यात स्वागत करू, असे ते म्हणाले.
वंचित सारख्या समविचारी पक्षाशी मोट बांधणं अनिवार्य आहे. प्रकाश आंबेडकरांसोबत जायला आम्ही तयार आहोत, असे वक्तव्य वडेट्टीवार यांनी केले आहे.
आगामी मनपा निवडणुकीसाठी काँग्रेस तयार आहे. जनतेचा विश्वास आमच्यावर आहे. जे कमजोर आहे ते तयारी करतात. मजबूत आहे ते वेळेवर उतरतात, असे ते म्हणाले. इनकमिंगवर तुम्हाला फार वाट बघावी लागणार नाही. सामान्यांच्या प्रतिक्रिया राजकारण्यांचे तोंडात शेण घालणाऱ्या आहेत. आज आम्हाला आमदार म्हणायला लाज वाटतेय. या स्थितीत काँग्रेसवर जनतेचा विश्वास वाढतोय. बरीच मंडळी काँग्रेसमध्ये येणार आहेत, असे ते म्हणाले.
ज्याची संख्या जास्त त्याचा विरोधीपक्ष नेता. मी यापूर्वी विरोधीपक्ष नेता राहिलोय. पुन्हा जबाबदारी मिळाली तर आनंद होईल. याबाबत हायकमांड निर्णय घेणार. न घाबरणारा, न झोपणारा दबावात न येणारा नेता पाहून हायकमांड निर्णय घेणार आहे. शिंदे फडणवीस पवार सरकारमध्ये वाद होण्याची सुरुवात झाली. आता विधानसभेच्या ४०० जागा कराव्या लागणार आहेत. लोकसभेच्या १०० करुन टाका. हे सर्व हास्यास्पद सुरु आहे, असा टोला वडेट्टीवार यांनी लगावला आहे.