ऑनलाइन लोकमत
रत्नागिरी, दि. 17 - येत्या हज यात्रेसाठी देशाला २ लाख हज यात्रेकरूंचा कोटा मिळणार आहे. त्यामुळे या यात्रेसाठी कोकणच्या कोट्यातही वाढ होईल. ४०० यात्रेकरूंचा कोटा कोकणला मिळेल. त्यामुळे अनेकांचे या यात्रेला जाण्याचे स्वप्न साकार होईल, असे प्रतिपादन अखिल भारतीय हज कमिटीचे उपाध्यक्ष शेख जीना यांनी रत्नागिरी येथे सोमवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
भाजपच्या रत्नागिरी जिल्हा संपर्क कार्यालयात जीना यांनी आज येथील मुस्लिम बांधवांची बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. हज यात्रेसाठी जाऊ इच्छिणाºयांची संख्या मोठी आहे. याआधी कोकणातून केवळ ६० ते ७० मुस्लिम बांधवांनाच हज यात्रेला जाण्याची संधी मिळत होती. ही संख्या वाढवून मिळावी, अशी मागणी सुरू होती. त्याचा विचार करून येत्या यात्रेसाठी कोकणचा कोटा ४००पर्यंत वाढवून मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
कॉँग्रेसने देशात ६० वर्षे राज्य केले. मात्र मुस्लिम समाजाला काय दिले, असा सवाल त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर गेली अडीच वर्षे केंद्रीय सत्तेत असलेल्या भाजपने मात्र मुस्लिम समाजाबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. गोव्यात आघाडी सरकारच्या काळात उर्दु अंजुमन स्कूलना निधी दिला जात नव्हता. भाजप सरकारने या शाळांंना आता निधीची उपलब्धता करून दिली आहे. मुस्लिम समाज भाजपबरोबर राहिल्यास समाजाचे भवितव्य उज्वल होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार चांगले निर्णय घेत आहे, असे जीना म्हणाले.
नगर परिषदांच्या निवडणुका जिल्ह्यात येत्या २७ नोव्हेंबर २०१६ रोजी होत आहेत. रत्नागिरी, राजापूर, खेड, चिपळूण नगरपरिषद व दापोली नगर पंचायत येथे या निवडणुका होत असून, या सर्व ठिकाणी असलेल्या मुस्लिम बांधवांबरोबर आपण बैठका घेणे सुरू केले आहे. राजापूर येथे दोन ठिकाणी, तर रत्नागिरीत एका ठिकाणी मुस्लिम बांधवांच्या बैठका सोमवारी घेण्यात आल्या. त्यांच्या भावना, त्यांची मते जाणून घेण्यात आली. त्यावेळीही मुस्लिम समाजाने या निवडणुकांमध्ये भाजपाबरोबर राहणार असल्याचे मत व्यक्त केले, असा दावा जीना यांनी केला.
भाजपबाबत जोरदार समर्थन करताना शेख जीना म्हणाले, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकार आल्यानंतर विकासाबाबत नवे पर्व सुरू झाले आहे. सर्व देशांचा दौरा करणारे मोदी यांना त्या देशांनीही एक यशस्वी पंतप्रधान म्हणून मान्यता दिली आहे. सर्वच आघाड्यांवर भाजप सरकार यशस्वी होत आहे. अशा वेळी मुस्लिम समाजानेही भाजपबरोबर राहावे. त्यामुळे सर्व स्तरावर मुस्लिम समाजाचा सर्वांगिण विकास होईल, असा विश्वास जीना यांनी व्यक्त केला.