पुणे : राज्यातील १४६ कारखान्यांनी ४९२ लाख टन उसाचे गाळप केले असून, ५४ लाख ७० हजार टन साखर उत्पादित केली आहे. तर, ४१ कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. गाळपासाठी उसाची उपलब्धता कमी असल्याने यंदा अवघे १४६ कारखाने गाळप हंगामामधे सहभागी झाले होते. यापूर्वीच्या सलग दोन हंगामामध्ये राज्यात विक्रमी १०७ लाख टनांहून अधिक साखर उत्पादन झाले होते. यंदा मात्र ६० ते ६२ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज आहे. कोल्हापूर विभागातील ३५ पैकी ५ कारखाने बंद झाले असून, १७०.६६ लाख टन ऊस गाळपातून २० लाख टन साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागातील ३०पैकी ५ कारखाने बंद झाले आहेत. येथे १२९.२७ लाख टन ऊस गाळपातून १४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील २८पैकी ५ कारखाने बंद झाले असून, ६७.१९ लाख टन ऊस गाळपातून साडेसहा लाख टन साखर उत्पादित झाली आहे. अहमदनगरमधील १६ पैकी ८ कारखाने बंद झाली असून, ५४.९६ लाख टन ऊस गाळपातून साडेपाच लाख टन साखरेचे उत्पादन झाले. औरंगाबाद विभागातील १९ पैकी १२ कारखाने बंद झाले आहेत. या कारखान्यांनी ३४.९४ लाख टन उसाचे गाळप घेतले असून, सव्वातीन लाख टन साखर उत्पादित झाली. नांदेडमधील १३पैकी ४ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, २७ लाख टन ऊस गाळपातून पावणेतीन लाख टन साखरेचे उत्पादन झाले. अमरावतीमधील दोनही कारखाने बंद झाले असून, ४ लाख टन ऊस गाळपातून ४० हजार टन साखरेचे उत्पादन झाले आहे. नागपूरमधील ३ कारखान्यांनी ३.८९ लाख टन ऊस गाळपातून ३० हजार टन साखर उत्पादित केली.
राज्यातील ४१ साखर कारखान्यांची धुराडी बंद ; ५४ लाख टन साखर उत्पादित
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2020 10:00 PM
पुणे, कोल्पापूर, सोलापूरातील प्रत्येकी ५ कारखाने बंद
ठळक मुद्देयापूर्वीच्या सलग दोन हंगामामधे राज्यात विक्रमी १०७ लाख टनांहून अधिक साखर उत्पादन यंदा ६० ते ६२ लाख टन साखर उत्पादन होईल, असा अंदाज