लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली: कोविडच्या महामारीतही खाजगी क्षेत्रातील रूग्णालय कर्मचारी,डॉक्टर्स यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रचंड काम केले. कितीतरी डॉक्टरांना उपचार करतांना स्वतःलाच कोरोनाची लागण झाली. मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करताना शुल्लक कारणांनी त्याना मारहाण, धमक्या, रुग्णालयावर हल्ले असे सत्र सुरू आहेत. त्याबद्दल केंद्र, राज्य सरकार काहीच करत नाही, त्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य असलेल्या डॉक्टरांनी काळ्या फिती, मास्क वापरून शुक्रवारी काम केले. त्यात डोंबिवलीचे ४१५ डॉक्टर आणि त्यांचा स्टाफ सहभागी झाला होता.
डोंबिवली शाखेच्या अध्यक्षा डॉ. भक्ती लोटे ही माहिती दिली. सतत हे हल्ले होण्याच्या घटना घडत असल्याने त्या विरोधात कठोर असा केंद्रीय कायदा सरकारने त्वरित आणावा. हल्लेखोर समाजकंटकांवर जलद न्यायालयात सुनावणी होऊन कठोर कारवाई व्हावी. या समाजकंटकांना जामीन मिळू नये अशी तरतूद या कायद्यात असावी. रूग्णालय आणि दवाखाने हे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात यावी, अशी।मागणी त्यांनी केली.
निषेध करत असताना रुग्णसेवा कार्य अखंडित राहण्यासाठी डॉक्टर्स नेटाने आणि जीव तोडून काम करत आहेत. असोसिएशन अनेक वर्षे केंद्राने याबाबतचा कायदा बनवावा यासाठी पाठपुरावा करत असून त्याचा मसुदा तयार करून दिला आहे, मात्र अमलबजवणी होत नसल्याने नाराजी व्यक्त होत असून त्या विरोधात आवाज उठवण्यात येत आहे. तरी सरकारने यापुढेही दाद न दिल्यास तीव्र आंदोलन करावे लागेल असे त्यांनी सांगितले. असोसिएशनचे वरीष्ठ याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या आंदोलनात सहभागी झालेल्या डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले.