मुंबई : तापी नदीवरील धुळे व नंदूरबार जिल्ह्यातील पूर्ण झालेल्या प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजमधील पाण्याच्या वापरासाठी धुळे जिल्ह्यातील आठ व नंदूरबार जिल्ह्यातील १४ अशा एकूण २२ सहकारी उपसा सिंचन योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी ४१.७८ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकांना आज मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या खर्चास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यासंदर्भात राज्यपालांना विनंती करण्यात येणार असून त्यानंतरच त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे. नियमित खर्चातून या कामांसाठी ७.१६ कोटी रुपयेच उपलब्ध होऊ शकले असते म्हणून हा निर्णय घेण्यात आला. तापी नदीवर २२ राज्यस्तर उपसा सिंचन प्रकल्पांची उभारणी १९८० ते १९९६ या काळात करण्यात आली होती. त्यानंतर हे प्रकल्प ४ ते १० वर्षाच्या कालावधीसाठी पूर्ण कार्यक्षमतेने कार्यान्वित होते. या योजनांच्या वरच्या भागात असलेल्या तापी खोऱ्यात नव्याने प्रकल्प होत गेल्याने नदीपात्रातील पाणी आटत गेले. त्यामुळे पाण्याअभावी या उपसा सिंचन योजना बंद पडल्या. त्यानंतर २००७-०८ मध्ये तापी नदीवर प्रकाशा व सारंगखेडा बॅरेजेसची उभारणी झाल्यामुळे शाश्वत पाणीसाठा निर्माण झाला आहे. तापी नदीपात्रालगतच्या भौगोलिक परिस्थितीमुळे पाणी वापरासाठी उपसा सिंचन योजनांशिवाय पर्याय नाही. या उपसा सिंचन योजना बंद पडल्यामुळे बॅरेजेसमधील पाणी विनावापर खाली सोडून द्यावे लागत आहे. या विनावापर पाण्याचा शेतीच्या सिंचनासाठी उपयोग करण्यासाठी आजचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा ५९ गावांना लाभ होणार असून ९०.५० दलघमी पाणी सिंचनासाठी वापरात येऊन १४ हजार ४१३ हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. या योजनांच्या विशेष दुरूस्तीची कामे तापी पाटबंधारे विकास महामंडळा करेल. (विशेष प्रतिनिधी)
धुळे, नंदुरबार उपसा सिंचनासाठी ४२ कोटी
By admin | Published: May 04, 2016 3:15 AM