मुंबई : आर्थिक मंदी, रेरा, जीएसटी आणि नोटाबंदीमुळे डबघाईला आलेल्या बांधकाम व्यवसायाला कोरोनाचा तडाखा बसला आहे. गतवर्षीच्या तुलनेत नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षातील गृहखरेदीत तब्बल ४२ टक्क्यांनी घट झाल्याचे निरीक्षण नोंदविले आहे. यंदाच्या जानेवारी व मार्च महिन्याची तुलना केली असता ती घट ७८ टक्के एवढी असून आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीतली घट २४ टक्के आहे. क्रेडाई आणि एमसीएचआय या बांधकाम व्यावसायिकांच्या संघटनांनी केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती हाती आली आहे.
मंदीतून सावरण्यासाठी बांधकाम व्यावसायिक प्रयत्नशील असताना कोरोनाचे संकट कोसळले आहे. त्या पार्श्वभूमीवर क्रेडाई आणि एमसीएचआय यांनी सर्वेक्षणाअंती अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात या व्यवसायाचा ढासळता आलेख मांडण्यात आला आहे. मार्च महिन्यात गृहकर्जाचे हप्ते चुकविण्याचे प्रमाण २५० टक्क्यांनी वाढल्याचे निरीक्षणही यात नोंदविले आहे. ठप्प झालेले बांधकाम पुन्हा सुरू करताना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागेल. आर्थिक मंदीमुळे गृहखरेदीला चालना मिळण्याची चिन्हे धूसर आहेत. त्यामुळे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी वित्तीय पुरवठा उभा करताना अडचणी निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
व्यावसायिक बांधकामांवरही संकट
गेल्या वर्षी तब्बल ६ कोटी २० लाख चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या व्यावसायिक जागांचे व्यवहार झाले होते. यंदा त्यात आणखी प्रगती होईल या आशेवर कोरोनाच्या संकटाने पाणी फेरले आहे. आंतरराष्ट्रीय आणि परदेशी कंपन्यांकडून प्रस्तावित असलेल्या जागांचे व्यवहार लांबणीवर पडले आहेत. व्यावसायिक जागांची मागणीच कमी झाल्यास सध्या सुरू असलेल्या बांधकामांवरही विपरीत परिणाम होईल, अशी भीतीसुद्धा या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.