मुंबई: राज्य सरकारने शाळांचे अनुदान थकविल्याची ओरड एकीकडे होत असताना शिक्षण खात्याच्या ढिसाळ कारभारामुळे अनुदानाचे प्रस्ताव सरकार दरबारी रखडले असल्याची बाब मंगळवारी शिक्षण समितीच्या निदर्शनास आणण्यात आली़ अशा ४२ खासगी अनुदानित शाळांचे अनुदान तब्बल दोन वर्षांपासून थकले आहे़पालिकेच्या शाळांना राज्य सरकार अनुदान देत नसल्याची तक्रार होत होती़ एप्रिल २०१५ मध्ये याची चौकशी करण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले़ याबाबत शिक्षण विभागाने तब्बल ११ महिन्यांनंतर अहवाल सादर केला आहे़ त्यानुसार, पालिकेकडून योग्य प्रकारे व योग्य मार्गाने प्रस्ताव पाठविण्यात येत नसल्याने अनुदान मिळत नसल्याचे उघडकीस आले आहे़याचा फटका ४२ खासगी अनुदानित शाळांना बसला आहे़ या शाळांना दोन वर्षांपासून अनुदान मिळालेले नाही़ यामध्ये २६ मराठी शाळा असल्याचे शिक्षण समितीचे सदस्य शिवनाथ दराडे यांनी सांगितले़ मात्र, यावर प्रशासनाला कोणताच खुलासा करता आला नाही़ त्यामुळे हा मुद्दा राखून ठेवण्यात आला असून, यावर अधिक माहिती मागविण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)
शिक्षण खात्याच्या ढिसाळ कारभाराचा ४२ शाळांना फटका
By admin | Published: April 27, 2016 2:32 AM