ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. १५ - गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईला सामोरे जाणा-या सांगली जिल्ह्यातील महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवरील ४२ गावं आता कर्नाटकमध्ये जाण्याच्या तयारीत आहे. कर्नाटकमध्ये स्थलांतरीत करावं असं पत्रच या ग्रामस्थांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले असून कर्नाटक सरकारलाही त्यांनी ही विनंती केली आहे.
जत तालुक्यात महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर ४२ गावं असून या गावात गेल्या अनेक वर्षांपासून भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. पाण्यासाठी आम्हाला दररोज मैलोन मैल चालावे लागते, स्त्रियांना याचा त्रास होत असल्याची तक्रार एका महिला ग्रामस्थाने केली. तर स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वेळोवेळी पाठपुरावा करुनही त्यांनीही या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून होणा-या या दुर्लक्षाला कंटाळून या गावातील रहिवाशांनी कर्नाटकमध्ये जाण्याची तयारी सुरु केल्याचे या ग्रामस्थांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.