मुंबई : राज्यातील अभियांत्रिकी शिक्षणाचा घसरलेला दर्जा तसेच काही विशिष्ट शाखांमध्ये नोकऱ्यांची संधी कमी झाल्याने अभियांत्रिकी शिक्षणाकडे वळण्याचे प्रमाण यंदाही कमीच आहे. राज्यातील अभियांत्रिकी पदवी, पदविका, पदव्युत्तर पदवी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया संपली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने पुरविलेल्या माहितीनुसार यंदा पदवी प्रवेशाच्या ५६ हजार ४८८,पदविका प्रवेशाच्या ७१ हजार ९५४ तर पदव्युत्तर प्रवेशाच्या ८०९९ जागा रिक्त आहेत. यंदा प्रवेशाच्या एकूण जागांमध्ये घट करण्यात आल्याने यंदाच्या प्रवेशाची स्थिती मागील वर्षीप्रमाणेच आहे.केंद्र सरकारने यंदा लागू केलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास संवर्ग (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अत्यल्प विद्यार्र्थ्यांनी घेतला आहे. यामुळे इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट, आर्किटेक्ट आदी अभ्यासक्रमांच्या शेकडो जागा रिक्त राहिल्या आहेत. या कोट्यातील अभियांत्रिकी पदवीच्या ८२ टक्के तर पदव्युत्तर अभियांत्रिकीच्या ९४ टक्के जागा रिक्त राहिल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त राहिल्यामुळे मागील प्रवेशांप्रमाणेच काहीशी स्थिती यंदा पाहायला मिळत आहे.अभियांत्रिकीच्या पदवीच्या शासकीय संस्थामधील ९८ शासकीय अनुदानित संस्थांमधील ३२ तर विनाअनुदानित संस्थांमधील ८१५० अशा एकूण ८ हजार ३७२ जागा रिक्त राहिल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गासाठी यंदा १० हजार २४९ जागा उपलब्ध होत्या, त्यातील केवळ १८७७ जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत.हीच परिस्थिती अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर प्रवेशाची आहे. पदव्युत्तर अभियांत्रिकीच्या यंदा आर्थिकदृष्ट्या मागास संवर्गासाठी एकूण ११६० जागा उपलब्ध होत्या. त्यापैकी केवळ ६९ जागांवर प्रवेश निश्चित होऊन १०९१ जागा रिक्त राहिल्या आहेत. यामधील शाकीय संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ६१, शासकीय अनुदानित संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ६८ तर विनाअनुदानित संस्थांमधील रिक्त जागांची संख्या ९२३ आहे.
राज्यात अभियांत्रिकीच्या ४३ टक्के जागा रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 1:06 AM