पुणे : राज्यातील १९३ पैकी ४३ कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, ८५७.३३ लाख टन ऊस गाळपातून ९५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा देखील ११.१० टक्के इतका मिळाला आहे. राज्य,यंदाही साखर उत्पादनाचा शंभर लाख टनांचा आकडा पार करेल अशी स्थिती आहे. गेल्या हंगामात देशात साखरेचे ३२० लाख टन उत्पादन झाले होते. त्यात राज्याचा वाटा १०७ लाख टनांचा होता. यंदा मॉन्सूनने दिलेली ओढ आणि उसावर हुमणी रोगाच्या झालेल्या प्रादुर्भावामुळे साखरेचे उत्पादन ९५ लाख टनांपर्यंत घसरेल असा अंदाज साखर क्षेत्रातून वर्तविण्यात आला होता. मात्र, अजूनही राज्यातील दीडशे कारखाने सुरु आहेत. त्यातही पुणे, कोल्हापूर आणि सोलापूर या ऊस पट्ट्यातील बहुतांश कारखान्यांमधील गाळप सुरु असल्याने यंदा देखील साखर उत्पादनाचा शंभर लाख टनांचा आकडा पार होईल अशी स्थिती आहे. कोल्हापूर विभागातील २६ सहकारी आणि १२ खासगी कारखान्यांमधे १९७.१६ लाख टन ऊस गाळपातून २४ लाख टन साखर उत्पादन झाले असून, सरासरी साखर उतारा १२.२४ टक्के मिळाला. पुणे विभागातील ३१ कारखान्यांतून १८० लाख टन ऊस गाळपातून २० लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. तर, साखर उतारा ११.४२ टक्के मिळाला. सोलापूर जिल्ह्यातील ४३ कारखान्यांनी १९६.१४ लाख टन ऊस गाळपातून १९ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले असून, साखर उतारा १०.१७ टक्के आहे. अहमदनगर येथील २८ साखर कारखान्यांमध्ये १२८.०५ लाख टन ऊस गाळपातून १३.९० लाख टन साखर उत्पादन झाले असून, १०.८९ टक्के साखर उतारा मिळाला. औरंगाबाद येथील २४ कारखान्यांतून ७८.६९ लाख टन ऊस गाळपातून ८ लाख टन आणि नांदेड येथील २३ कारखान्यांमधून ६८.७४ लाख टन ऊस गाळपातून सात लाख टन साखर उत्पादन झाले. औरंगाबादचा साखर उतारा १०.३७ आणि नांदेडचा ११.०५ टक्के इतका आहे. अमरावती विभागात ३.१३ लाख टन ऊस गाळपातून ३० हजार टन साखरेचे उत्पादन झाले असून, नागपूरात ५.१२ लाख टन ऊस गाळपातून ५० हजार टन साखरेचे उत्पादन झाले. येथील साखर उतारा अनुक्रमे १०.३२ आणि ९.८९ टक्के इतका आहे. --------------मंडलिक, जयवंत आणि सोमेश्वर साखर उताऱ्यात अव्वल कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मंडलिक कारखान्याचा साखर उतारा राज्यात सर्वाधिक १२.८५ टक्के (म्हणजे १०० किलोला १२.८५ किलो साखर) इतका आहे. या कारखान्याने पाच मार्च अखेरीस ४ लाख ५३ हजार ९१० टन ऊस गाळपातून, ५ लाख ८३ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. खालोखाल साताºयाच्या जयवंत शुगरने १२.८३ इतका साखर उतारा मिळविला आहे. येथे ५ लाख २० हजार ७० टन ऊस गाळपातून ६ लाख ६७ हजार २०० क्विंटल साखर उत्पादित झाली. पुण्यातील सोमेश्वर साखर कारखान्याला ११.९५ टक्के साखर उतारा मिळाला. येथे ७ लाख ७९ हजार ३२० टन ऊस गाळपातून, ९ लाख ३१ हजार ३५० क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
हंंगाम संपलेल्या कारखान्यांची संख्या कोल्हापूर १२, पुणे ६, सोलापूर ११, अहमदनगर ७, औरंगाबाद २, नांदेड ३, अमरावती २