मुंबई- जून महिन्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं सत्र सुरूच आहे. जानेवारी-फेब्रुवारी या दोन महिन्यात राज्यामध्ये एकुण 435 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. गेल्यावर्षी याकाळात एकुण 414 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. एकंदरीतच गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी शेतकरी आत्महत्येचा आकडा वाढला आहे. अधिकृत आकडेवारीनुसार मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्येमध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षाच्या सुरूवातीच्या दोन महिन्यातील आकडेवारी पाहता आत्महत्येच्या संख्येत वाढ झाली आहे.
मराठवाड्यातील दुष्काळी भागात यावर्षी 152 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या. गेल्यावर्षी ही संख्या 134 होती. म्हणजेच शेतकऱ्यांच्या आत्महत्येत 13 टक्क्यांनी वाढ झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्येच्या 72 घटना यावर्षी घडल्या. गेल्यावर्षी 47 घटना होत्या. म्हणजेच उत्तर महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांमध्ये 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
नागपूरमध्ये सर्वाधीक शेतकरी आत्महत्या झाल्याची नोंद आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात 199 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. विदर्भ व मराठवाडा दोन्ही कापूस उत्पादक प्रदेश आहेत.