लंडन : पृथ्वीवरून मंगळावर फक्त जाण्यासाठी जगभरातील इच्छुकांमधून पहिल्या टप्प्यात ७०५ जणांची निवड करण्यात आली असून त्यात भारतातील ४४ जणांचा समावेश आहे. यापैकी १७ महिला आहेत. नेदरलॅण्डमधील ‘मार्स वन’ या स्वयंसेवी संस्थेने लाल ग्रहावर वसाहत करण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी मोहीम हाती घेतली असून या मोहिमेद्वारे २०२४ मध्ये चौघांना मंगळावर पाठवण्यात येणार आहे. हे लोक मंगळावर वसाहत करणारे पहिले मानव असतील. निवड चाचणीच्या पहिल्या टप्प्यात ३५३ इच्छुकांना बाद करण्यात आले आहे. या संधीसाठी आता केवळ ७०५ जण स्पर्धेत राहिले असून त्यात ४४ भारतीयांचा समावेश आहे. यापैकी २७ पुरुष, तर १७ महिला असून ते नवी दिल्ली, हैदराबाद, मुंबई, कोलकाता, पुणे आणि थिरुअनंतपुरम आदी शहरांतील आहेत. पहिल्या टप्प्यात १४० देशांमधून अर्ज आले होते. त्यात भारतातील २० हजार जणांचा समावेश होता. आता उर्वरित इच्छुकांची ‘मार्स वन’तर्फे मुलाखत घेतली जाणार आहे. निवड चाचणीचा दुसरा टप्पा सुरू करण्यास आम्ही उत्सुक आहोत. या टप्प्यात उमेदवारांना त्यांचे ज्ञान, बुद्धिमत्ता, नवीन परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता व व्यक्तिमत्त्व दर्शवावे लागणार आहे, असे मार्स वनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी नोरबर्ट क्राफ्ट यांनी सांगितले. डिसेंबर २०१३ मध्ये ‘मार्स वन’ने दोन लाख अर्जांमधून १,०५८ उमेदवारांची निवड केली होती. त्यात ६२ भारतीयांचा समावेश होता. निवड झालेल्या या सर्वांना ‘मार्स वन’ने त्यांच्या प्रकृतीची माहिती कळवण्यास तद्वतच ‘मार्स वन’ अर्जदार म्हणून आॅनलाइन खाते उघडण्यास सांगितले होते. या दोन्ही गोष्टी यशस्वीरीत्या पूर्ण करणार्या ४१८ पुरुष व २८७ महिलांना मुलाखतीसाठी पाचारण केले जाणार आहे. (वृत्तसंस्था)
निवड झालेल्या सर्वांना ‘मार्स वन’ने त्यांच्या प्रकृतीची माहिती कळवण्यास तद्वतच ‘मार्स वन’ अर्जदार म्हणून आॅनलाइन खाते उघडण्यास सांगितले. या दोन्ही गोष्टी यशस्वीरीत्या पूर्ण करणार्यांना मुलाखतीसाठी पाचारण केले जाणार आहे.