अहमदनगर : भंडारदरा धरणातून मराठवाडा जायकवाडीसाठी ४ हजार ५०० क्यूसेक ने सकाळी ९वाजण्याच्या सुमारास पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, नेवासा तालुक्यातील शेतकरी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मूळ धरण परिसरात जाऊन आंदोलन करण्याचा प्रयत्न केला.
पहिल्या तीन दिवसांत निळवंडे धरण पूर्ण भरून घेणार असून ओझर बंधाऱ्याच्या पूर्वेकडील प्रवरा नदी पात्रातील के. टी. वेअरच्या फळ्या काढण्यात आल्या आहेत. पोलीस बंदोबस्तात पाणी जायकवाडीकडे सोडण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी लोकमतशी बोलताना दिली.
दरम्यान, नाशिकच्या भावली धरणातील पाणी ठाणे जिल्ह्यातील शहापुरलाही देण्यात येणार असून या धरणातील पाणी शहापूरसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे भावली धरणावरूनही वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून गुरुवारपासून मराठवाड्याला सोडण्यात येणाऱ्या पाण्याला इगतपुरी तालुका शिवसेनेने कडवा विरोध केला असून या धरणातून पाण्याचा एक थेंबही सोडू देणार नाही असा आक्रमक पवित्रा माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्यासह धरणालगतच्या शेतकऱ्यांनी दिला आहे.
पाणी रोखण्यासाठी शिवसेनेने आजपासूनच दारणा धरणावर ठिय्या आंदोलन सुरू केले असून, हा विरोध झुगारून जर पाणी सोडले तर आंदोलन आक्रमक करून सामूहिक जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.