मुंबई :
राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची औषधे आणि इतर अत्यावश्यक वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील काही महिन्यांपासून हा तुटवडा जाणवत असून राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या रुग्णालयांमध्ये दैनंदिन वापराची महत्त्वाची औषधे आणि ग्लोव्हज, सिरिंज, इंजेक्शनच्या सुया अशा अत्यावश्यक साहित्य नसल्याची बाब समोर आली आहे.
शासकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणारे रुग्ण आर्थिक दुर्बल स्तरातील असतात. पण, औषध आणि इतर अत्यावश्यक तुटवड्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना इंजेक्शनची सुई बाहेरून आणा, असे सांगितले जाते. त्यामुळे निवासी डॉक्टरांना नाराजीला सामोरे जावे लागते. ग्लोव्जशिवाय उपचार करताना एचआयव्हीसारख्या आजारांचा धोका असतो, अशी काही निवासी डॉक्टरांनी दिली.
औषधसाठा वरिष्ठ स्तरावरून निविदा काढून येत असल्याने या कामात अडथळे येत असल्याचे काही आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. डॉक्टरांनी औषधे आणि अत्यावश्यक साधनांशिवाय रुग्णांवर उपचार कसे करायचे? ही परिस्थिती म्हणजे ढाल-तलवारीशिवायच सैन्याने लढाईला जाण्यासारखे आहे, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
शासनाकडून देयके थकीतच शासनाकडून देयके थकीत असल्याने औषध पुरवठादारांनी काही काळ औषध पुरवठा थांबविला. परिणामी, नाॅन कोविड सेवा पूर्ववत होताना, रुग्णालयात गर्दी वाढत असताना सातत्याने बाहेरून औषधे आणावी लागत असल्याने रुग्णांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्थानिक पुरवठादारांची १२५ कोटींची देयके थकीत आहेत. शासनाने मार्चअखेरीस अध्यादेश काढला आहे, परंतु अजूनही पूर्तता नाही.- अभय पांडे, अध्यक्ष, ऑल फूड अँड ड्रग लायसन्स फाऊंडेशन
औषधे बाहेरून आणण्याचा मनस्तापपोटदुखीवर आवश्यक इंजेक्शन आणि औषधे उपलब्ध नाहीत. अत्यावश्यक औषधांपैकी डेक्सा, ऐट्रोफिल, डायक्नो, पित्ताच्या त्रासावरील रॅनटॅक ही औषधही उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.- शौनक शहा, रुग्ण
केवळ घोषणासरकार फक्त घोषणा करते. रुग्णालयांत औषधे उपलब्ध नाहीत. औषधे बाहेरून घ्या, असे सांगून सरकारी रुग्णालयांतून रुग्णांना बाहेरचा रस्ता दाखवला जातो,’ असे फैय्याज शेख या रुग्णाने सांगितले.