लोकमत न्यूज नेटवर्कनागोठणे : येथील अंबा नदीवरील केटी बंधाऱ्यातून जेएसडब्ल्यू कंपनीमार्फत नागोठणे शहराच्या पूर्व भागासह ४५ गावे आणि वाड्यांना नळाद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. नदीत आवश्यक तेवढा पाण्याचा साठा उपलब्ध नसल्याचे कारण पुढे करून शनिवारपासून हा पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झाला असल्याने ही सर्व गावे तहानेने व्याकूळ झाली आहेत. महामार्गावर वाकण येथे नव्याने बांधण्यात येत असलेल्या पुलाच्या कामासाठी नदीचा नैसर्गिक पाण्याचा ९० टक्के प्रवाह मातीच्या भरावाने व्यापून टाकल्यानेच केटी बंधाऱ्यात आवश्यक तेवढे पाणी येत नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विलास गोळे यांच्यासह त्रस्त नागरिकांनी केला आहे. जनतेच्या रेट्यानंतर कोलाडच्या पाटबंधारे खात्याचे उपअभियंता गांधी यांनी बुधवारी केटी बंधाऱ्याला भेट देऊन पाहणी केली आहे. सरपंच प्रणय डोके, उपसरपंच शैलेंद्र देशपांडे, प्रकाश मोरे यांच्यासह सदस्यांनी पाठपुरावा चालू केल्याने पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.येथील अंबा नदीवरील केटी बंधाऱ्यात पाण्याचा साठा कमी प्रमाणात असल्याने शनिवारपासून नागोठणे ते डोलवी मार्गातील सर्व गावांना पाणीपुरवठा करणे बंद झाले आहे व त्यामुळे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कोलाडच्या पाटबंधारे खात्यामार्फत डोलवहाळ धरणातून कालव्यामार्गे नागोठण्याच्या अंबा नदीत पाणी सोडले आहे, असे संबंधित खात्याकडून सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात हेदवली येथे कालव्याची पाहणी केली असता, अजित जंगम यांच्यासह तेथील गावकऱ्यांनी कालव्यात पाणी सोडलेच नसल्याचे स्पष्ट केले. कालव्यात पाणी न सोडल्याने पाण्याची पातळी ४ फुटांनी कमीच असल्याचे त्यानिमित्ताने उघड झाल्याने उपअभियंता गांधी यांचे म्हणणे फोलच ठरत आहे. अधिकारी टोलवाटोलवीची उत्तरे देत असल्याने पाटबंधारे खात्याने नागोठण्यातील जनतेचा अंत पाहू नये असे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मोरे म्हणाले. जनतेचा उद्रेक झाला तर हेच खाते जबाबदार असेल असे विलास गोळे म्हणाले. मुंबई - गोवा महामार्गावर वाकण येथे मागील ३ ते ४ वर्षांपासून नवीन पूल बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे. बांधकामाच्या साहित्याची वाहतूक करण्यासाठी अंबा नदीचे पाणी अडवून त्याठिकाणी दोन्ही बाजूला मातीचा भराव करण्यात आला आहे. या भरावामुळे ६० ते ७० मीटररुंदीचे अंबा नदीचे पात्र पाटबंधारे खात्याच्या कामामुळे १० फुटांवर आले असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. कालव्यातून नदीत मोठ्या प्रमाणात पाणी सोडले, तर मातीच्या भरावाला धक्का पोहोचेल व त्यासाठी नदीत पाणी सोडू नये यासाठी पाटबंधारे खाते व पुलाचे ठेकेदार यांच्यात समझोता झाला असल्याचा आरोप नागरिक करीत असले तरी पाटबंधारे खात्याचे अधिकाऱ्यांनी त्याचे खंडन के ले आहेत. मात्र, पाटबंधारे खात्याला पिण्याचे पाणी महत्त्वाचे, की मातीचा भराव असा प्रश्न नागरिक करतात. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील शिवसेना शाखाप्रमुख कीर्तिकुमार कळस यांनी केली असून वेळप्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. >उपाययोजना करण्याची मागणीकोलाडच्या पाटबंधारे खात्याचे कार्यकारी अभियंता गोडसे आणि उपअभियंता गांधी, राजेंद्र उभारे यांच्याकडून पाण्यात शेवाळ साचले असल्याने कालव्यात मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात नाही, असा खुलासा केला जात असला तरी, याची उपाययोजना करणे कोणाच्या हातात आहे, हे तरी या अधिकारीवर्गाने जाहीर करावे असे प्रकाश मोरे यांचे म्हणणे आहे. जलसंपदा, जलसंधारण खात्याचे राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पाटबंधारे खात्याच्या अनागोंदी कारभाराबाबत लवकरच साडेआठ हजार नागरिकांच्या सह्या असणारे निवेदन देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच पाणीटंचाईच्या गंभीर प्रश्नाबाबत सरपंच डोके तातडीने विशेष ग्रामसभा बोलविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पुलाच्या कामाचा ४५ गावांना फटका
By admin | Published: June 09, 2017 2:45 AM