मनोज शेलार , नंदुरबारजिल्ह्यातील ४५ गावांमध्ये व ९६८ पाड्यांवर अद्यापही वीज पोहचलेली नाही. स्वातंत्र्य अमृत महोत्सवाकडे वाटचाल करीत असताना सातपुड्यातील ही लोकवस्ती अजूनही अंधारातच बुडालेली आहे. अंधाराच्या पखाली वाहणाऱ्या या गावांत सरदार सरोवर प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील ३३ गावे व १७६ पाड्यांचाही समावेश आहे.नंदुरबार जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता विद्युतीकरणासाठी मोठी कसरत होत आहे. या ठिकाणी प्रशासनाने सौरदिवे बसविले आहेत. परंतु तेही अवघे एक ते दीड वर्षच टिकतात. त्यानंतर त्यांच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे गावे काळोखातच राहतात. जिल्ह्यातील ९३० पैकी ८८५ गावांमध्ये विद्युतीकरण झालेले आहे. २९९१ पैकी २०२३ पाड्यांपर्यंत वीज पोहचली आहे. मात्र ४५ गावे व ९६८ पाड्यांना विजेची प्रतीक्षा असून विविध योजनांच्या माध्यमातून २०१६ अखेर त्यापैकी १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. उर्वरित गाव व पाड्यांच्या विद्युतीकरणासाठी तब्बल २०० कोटी रुपये खर्च येण्याचा अंदाज आहे.विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांत १२ गावे व २०५ पाड्यांचे विद्युतीकरण करण्यात येत असून त्यात डीपीडीसीच्या माध्यमातून २०१४-१५ मध्ये ४५ पाडे, २०१५-१६ मध्ये ५२ पाडे, त्याचवर्षी आदिवास उपयोजनेतून १२ गावे व ६० पाडे, तर वनबंधू योजनेतून ४८ पाड्यांमध्ये तब्बल ४४ कोटी ८६ लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
नंदुरबारमध्ये ४५ गावे, ९६८ पाडे काळोखात
By admin | Published: August 31, 2016 5:17 AM