मुंबई - आरेमधील मुंबई मेट्रो 3 च्या कारशेडला शिवसेनेने विरोध केला असून, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येथील वृक्षतोडीच्या निर्णयाविरोधात मैदानात उतरले आहेत. मात्र एकीकडे अशी भूमिका तर दुसरीकडे औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी मनपा प्रशासनावर दबाव टाकून किमान 450 झाडांचा बळी घेणाऱ्या प्रकल्पाची निविदा उघडायला भाग पाडले आहे. त्यामुळे सेनेची दुटप्पी भूमिका समोर आली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक 10 कोटी रूपयांतच उभारा, असे पत्र राज्य सरकारने पाठवल्याने महापालिका आयुक्तांनी निविदा उघडण्याची प्रक्रिया थांबविली होती. मात्र स्थानिक शिवसेनेच्या नेत्यांच्या दबावामुळे अखेर पालिका प्रशासनाने त्या कामाची निविदा उघडली आहे. मात्र या प्रकल्पात तब्बल 450 झाडांची कत्तल करण्यात येणार आहे.
मुंबईत मेट्रोसारख्या विकास प्रकल्पासाठी झाडे कापू नयेत म्हणून युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी विरोध केला आहे. मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षातील नेत्यांनी मनपा प्रशासनावर दबाव टाकून 450 झाडांची बळी घेणाऱ्या प्रकल्पाची निविदा उघडायला भाग पाडले असल्याने, शिवसेनेची भूमिका दुटप्पी असल्याचे बोलले जात आहे.
मुंबईत आरेला हात लावला तर आम्ही सहन करणार नाही अशी भूमिका आदित्य ठाकरे यांनी घेतली होती. मात्र आता त्यांचीचं सत्ता असलेल्या औरंगाबाद महानगरपालिका बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी तब्बल 450 तोडणार आहेत. त्यामुळे जी भूमिका आरे जंगलातील 2700 झाडांना वाचवण्यासाठी शिवसेनेने घेतली होती, तीच भूमिका आता औरंगाबादच्या प्रकल्पासाठी पुन्हा आदित्य ठाकरे घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.