लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे गेल्या दहा वर्षांत निवृत झालेले ४६०० कर्मचारी व त्यानंतर त्यांच्या २५०० पत्नी यांचा पेन्शन न मिळताच मृत्यू झाला आहे. काही विधवा महिला आजही पेन्शनसाठी विभागीय कार्यालयात फेऱ्या मारत आहेत.
श्रीरंग बरगे म्हणाले की, पेन्शनबाबत चालक आणि वाहक व इतर कर्मचारी आणि अधिकारी जागरूक नसतात. सेवानिवृत्तीनंतरच ते जागे होतात. कर्मचारी किंवा अधिकारी एका विभागातून दुसऱ्या विभागात बदली झाल्यास कार्यमुक्ती आदेशासोबत ज्याप्रमाणे लास्ट पेमेंट सर्टिफिकेट दिले जाते, त्याचप्रमाणे पेन्शनसंदर्भातील माहिती सोबत देण्यास आळस केला जातो. कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्तीच्या अंतिम टप्प्यात किंवा निवृत्त झाल्यानंतर ही माहिती गोळा करण्यास सुरुवात होते एखाद्या कर्मचाऱ्यांची पेन्शन कॉन्ट्रिब्युशन अन्य कर्मचाऱ्याच्या नावावर वर्ग झाल्याचेही प्रकार घडले आहेत.
अधिकारी व कर्मचारी जबाबदार : एसटी महामंडळाच्या प्रशासन शाखेत पेन्शनचे कामकाज हाताळणारे कर्मचारी हे वारंवार बदलतात. यामुळेही अडचणी निर्माण होत असतात; पण मध्यवर्ती कार्यालयाकडून सर्वच विभागांना कायमस्वरूपी लिखित सूचना केल्या जात नाहीत. विभागीय व मध्यवर्ती कार्यालयाने कर्मचारी व अधिकारी यांची माहिती संकलित करून संबंधित पेन्शन ऑफिसमध्ये पाठविली पाहिजे; पण हे काम स्वतः निवृत्त कर्मचारी व अधिकारी फेऱ्या मारून करीत आहेत. पेन्शन न मिळण्यास एसटीमधील संबंधित अधिकारी व कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जात नाही, तोपर्यंत सेवानिवृत्तांना न्याय मिळणार नसल्याचे एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे म्हणाले.
कर्मचारी काँग्रेसचा मोर्चाचा इशारापेन्शनच्या मुद्यावर कोरोनानंतर महामंडळाच्या मुख्यालयावर कर्मचाऱ्यांच्या विधवांचा मोर्चा काढण्यात येणार आहे, असे एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले.