विश्वास पाटील , कोल्हापूरपश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ४६९ मंदिरांमध्ये भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्या-चांदीचे दागिने व इतर मौल्यवान वस्तूंचा थांगपत्ता लागत नसल्याचे धक्कादायक निरीक्षण लेखापरीक्षकांनी अहवालात नोंदविले असून, देवस्थानमधील इतर अनागोंदीवरदेखील बोट ठेवले आहे. या अहवालात जोतिबा व अंबाबाई मंदिराला वगळण्यात आले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ३,०६७ मंदिरांवर देखरेख ठेवणारी प.महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आहे. या समितीकडे देवस्थानच्या स्थावर व जंगम मालमत्ता व इतर बाबींचा कारभार आहे, परंतु जोतिबा व अंबाबाई मंदिर वगळता, अन्य देवस्थानांकडे किती दाग-दागिने आहेत, त्यांचे मूल्य किती, त्यामध्ये गेल्या काही वर्षांत काही वाढ झाली आहे का, या संबंधीची कोणतीही माहिती समितीकडे नसल्याचे लेखापरीक्षकांच्या अहवालात म्हटले आहे. दाग-दागिने पोलीस पाटलाच्या ताब्यात असतात, असे समितीचे म्हणणे आहे, परंतु कोणत्या पोलीस पाटलांकडे किती दागिने आहेत, त्याचे मूल्य किती, याची काहीही माहिती समितीकडे नाही. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० मधील कलम ३२-१ नुसार ज्या कर्मचाऱ्याकडे रोख रकमेची अभिरक्षा सोपविण्यात आलेली असते, अशा अधिकाऱ्यांकडून रकमेचे तारण देणे आवश्यक आहे. मात्र, अंबाबाई मंदिरातील सोने, चांदी व जवाहिर यांची रजिस्टरमध्ये नोंद ठेवण्याचे काम समितीचा कायम कर्मचारी नसलेल्या व्यक्तीकडे देणे चुकीचे असल्याचे लेखापरीक्षकांनी म्हटले आहे.कोल्हपुरातील अंबाबाई मंदिरामध्ये भक्तांकडून साडी अथवा साडीसाठी रोख रक्कम अर्पण केली जाते. त्याची रितसर पावती करून त्याचे स्वतंत्र रजिस्टर ठेवले जाते. तथापि, साडी रजिस्टर अद्ययावत नाही. देणगी स्वरूपात मिळालेल्या साड्या मूळ किमतीच्या ६० टक्के दराने विक्री केल्या जातात. त्याची रक्कम खात्यास नोंद आहे, परंतु साडी स्टॉक बुक ठेवलेले नाही. समितीने शिल्लक साठ्याची एकदाही मोजदाद करून तपासणी केलेली नाही. साड्या ठेवण्याची जागाही सुरक्षित नाही.दागिने अर्पणमध्येही घोळअंबाबाई देवीस भाविकांकडून जे दागिने अर्पण केले जातात, त्याच्या पावतीप्रमाणे रजिस्टरला नोंदी केल्या जातात, परंतु पावतीबुकाप्रमाणे रजिस्टरची व रजिस्टरप्रमाणे प्रत्यक्ष दागिन्यांची तपासणी केली असता, त्यामध्ये तफावत आढळली. ही बाब गंभीर असल्याचे ताशेरे लेखापरीक्षणात मारले आहेत.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अंतर्गत लेखापरीक्षक महेश गुरव यांनी १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ दरम्यान केलेल्या लेखापरीक्षणाचा हा अहवाल आहे. कोल्हापुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते सुरेश पोवार यांनी ९ जून २०१६ ला तो समितीकडे मागितला होता. समितीने ४ जुलै २०१६ ला हा अहवाल उपलब्ध करून दिला. अपुरे विमा संरक्षणप. महाराष्ट्र देवस्थान समितीकडील दागिन्यांचे मे. सी. एन. पाठक यांनी १९ डिसेंबर १९९३ ला मूल्यांकन केले होते. त्यानंतर, आजतागायत मूल्यांकन झालेले नाही. पूर्वीच्या मूल्यांकनानुसार समितीने अंबाबाईच्या दागिन्यांचा ३२.६८ लाख व जोतिबाच्या दागिन्यांचा ३६.१३ लाख रुपयांचा विमा उतरवला आहे. मूल्यांकन फारच जुने असल्याने आजच्या किमतीप्रमाणे दागिन्यांची किंमत कोट्यवधी रुपयांची आहे. त्या मूल्यांकनाप्रमाणे विमा संरक्षण घेणे आवश्यक आहे, असे निरीक्षण लेखापरीक्षण अहवालात नोंदविले आहे.
४६९ मंदिरांतील खजिना बेपत्ता
By admin | Published: September 15, 2016 3:48 AM