ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. २३ : दुग्धव्यवसाय करणाऱ्या दोन भागीदारांमध्ये आर्थिक हेवेदावे झाल्याने एका भागीदाराने सहकारी भागीदाराची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. सदर भागीदाराने कथित बाबाच्या मदतीने आपणास मुलगा होणार नाही, अशी भीती दाखवून आपली ४६ लाख तेरा हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद घोटी पोलीस ठाण्यात दिली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.
घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत व त्र्यंबकेश्वर तालुक्यात असणाऱ्या कानिफनाथ मंदिरात हा प्रकार घडला. यातील फिर्यादी ज्ञानेश्वर बहिरू भोसले, रा. धामणी यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, संशयित नवनाथ ऊर्फ अप्पा निंबा महाले रा.विल्होळी बबन बाबर, रामदास नथू धोंगडे, पोपट रामदास धोंगडेव विक्रम रामदास धोंगडे आदींनी संगनमत करून नवनाथ महाले यांनी फिर्यादीस आपण दत्ताचा अवतार असून, जीवनातसुखासाठी वाढोली येथील कानिफनाथ मंदिरात खेटी घालण्यास सांगितल्या.
तसेच तुझ्याजमिनीत देव आहेत व ते तुझ्यावर कोपलेले आहेत, यासाठी तुला जमीन विकावी लागेल. जर तू जमीन विकली नाही तर तुला पुत्र होणार नाही सर्व मुलीच होतील असे सांगून त्याची जमीन विकण्यास भाग पाडले. ते पैसे दुग्धव्यवसायात अडकवून तब्बल ४६ लाख तेरा हजार रुपयाची फसवणूक केली असल्याची फिर्यादीत स्पष्टकेले आहे. दरम्यान, याबाबत घोटी पोलिसांनी पाच संशयीताविरुद्ध फसवणूक व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंद कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शांताराम निंबेकर आदी करीत आहेत.
जादूटोण्याचा प्रकाराचा इन्कार ,वस्तुस्थिती वेगळीच
दरम्यान यातील संशियत नवनाथ उर्फ अप्पा निंबा महाले हे कानिफनाथाचे भक्त असून या भक्तीतून त्यांनी वाढोली ता.त्र्यंबकेश्वर येथे लोकवर्गणी तून कानिफनाथाचे मंदिर बांधले आहेत.या मंदिरात त्र्यंबकेश्वर तालुक्यासह लगतच्या तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात. यातील फिर्यादी ज्ञानेश्वर महाले व संशियत रामदास धोंगडे हे एकमेकांचे नातलग असून त्यांनी लाखो रुपये भागभांडवल वापरून घोटी येथे दुधसंकलन डेअरी टाकली होती. मात्र व्यवहार फिस्कटल्याने त्यांच्यात मतभेद झालेलं होते. यावर तडजोड करण्यासाठी नवनाथ महाले यांना मध्यस्थी करण्यास सांगितले होते . मात्र यावर कोणताही मार्ग न निघता नवनाथ महाले यांना लक्ष्यकरण्यात आले होते.यातूनच एक वाहन जाळण्याचा प्रयत्नही २५ डिसेंबर रोजी झाला होता. केवळ आर्थिक व्यवहारातून हा प्रकार घडलेला असताना त्यांना अंधश्रद्धेचे वलय देण्याचा प्रयत्न केला गेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.