ठाणे : तलावपाळी परिसरातून गुन्हे शाखेने शनिवारी ४६ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त केल्या. याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. सरकारने चलनातून बाद केलेल्या ५०० आणि हजार रुपयांच्या नोटा दलालीपोटी बदलण्याचे व्यवहार अद्यापही सुरूच आहेत. या व्यवहारासाठी मोठी रक्कम ठाण्यात आली असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला (घटक क्र.१) शनिवारी मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे आणि वरिष्ठ निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक निरीक्षक संदीप बागुल, समीर अहिरराव,उपनिरीक्षक कुश्ते यांनी तलावपाळी परिसरात सापळा रचला. सायंकाळी या परिसरातील चिंतामणी ज्वेलर्सजवळ आलेल्या एर्टीगा कारवर या पथकास संशय आला. कारमध्ये चालकाव्यतिरिक्त आणखी दोन जण बसले होते. पोलिसांची झडती घेतली असता, त्यांच्याजवळील बॅगमध्ये जुन्या नोटांची रोकड आढळली. ४६ लाखांच्या या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या असून आरोपींना ताब्यात घेण्यात आले. (प्रतिनिधी)
४६ लाख रुपयांच्या जुन्या नोटा जप्त
By admin | Published: February 27, 2017 5:20 AM