राजू काळे/ऑनलाइन लोकमतभार्इंदर, दि. 2 - येत्या आॅगस्टमध्ये पार पडणा-या आगामी पालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या नियंत्रणाखाली मंगळवारी येथील मॅक्सस बॅन्क्विट सभागृहात प्रभाग रचना आरक्षण सोडत काढण्यात आली. एकूण ९५ जागांपैकी ४६ जागा विविध आरक्षण निहाय महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. जाहीर झालेल्या प्रभाग रचनेनुसार एकूण २४ प्रभाग निश्चित करण्यात आले आहेत.प्रत्येक प्रभागात ३० ते ३५ हजार लोकसंख्या निश्चित करुनच प्रभाग रनचा करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक प्रभाग ४ जागांचा असला तरी उत्तन येथील प्रभाग २४ मध्ये एकुण जागा व लोकसंख्येच्या समीकरणानुसार ३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. भार्इंदर पश्चिमेला ६ प्रभागांत एकुण २३ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. पुर्वी याच प्रभागात २८ जागा होत्या त्या यंदा पाचने कमी करण्यात आल्या. भार्इंदर पुर्वेला देखील एकुण ६ प्रभागांत २४ जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. यापुर्वी येथे एकुण ३० जागा होत्या त्या ६ ने कमी करण्यात आल्या. मीरारोड मध्ये एकूण ८ प्रभागांत ३२ जागा निश्चित करण्यात आल्या असुन पुर्वी या ठिकाणी २८ जागा होत्या त्या ४ ने वाढल्या आहेत. पश्चिम महामार्गावरील काजुपाडा ते दहिसर चेकनाका दरम्यान एकच प्रभाग निश्चित करण्यात आला असुन पुर्वीप्रमाणेच येथे २ जागा होत्या त्यात २ ने वाढ झाली. मीरारोड येथील गोल्डन नेस्ट ते पश्चिम महामार्गादरम्यान ३ प्रभागांत १२ जागा निश्चित करण्यात आल्या असुन पुर्वी या ठिकाणी २ जागा होत्या त्यात १० ने वाढ झाली आहे. भार्इंदर पश्चिमेकडील प्रभाग १, ६, ७ मध्ये भाजपाचा प्रभाग असुन त्यात राष्ट्रवादीला भरपुर मेहनत करावी लागणार आहे. प्रभाग ८ मध्ये मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना भाजपाचा प्रत्येकी एक नगरसेवक असुन प्रभागात संमिश्र भाषिक मतदार असल्याने भाजपाला निवडणुक काहीशी जड जाणार आहे. प्रभाग २३ मध्ये वरचष्मा असला तरी काही भागावर भाजपाचे वर्चस्व असल्याने सेनेला आणखी जोर मारावा लागणार आहे. प्रभाग २४ मध्ये राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक लियाकत शेख यांचे वर्चस्व असले तरी या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचाही राबता असल्याने राष्ट्रवादीच्या वाताहतीमुळे शेख यांनी काँग्रेससोबत हातमिळवणी केल्यास त्यांचे पारडे जड होणार आहे. उत्तनचा हा प्रभाग काबीज करण्यासाठी भाजपाने देखील कंबर कसली आहे. भार्इंदर पुर्वेकडील प्रभाग २ मध्ये भाजपाचा प्रभाव असला तरी या प्रभागात याच पक्षाचे पाच विद्यमान नगरसेवक असल्याने उमेदवारी वाटपावेळी स्थानिक नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. प्रभाग ३ मध्ये सेनेचा प्रभाव वाढला असला तरी येथील मोठ्याप्रमाणात असलेल्या उत्तर भारतीयांना सेनेला आपलेसे करावे लागणार आहे. प्रभाग ४ मध्ये भाजपाचे विद्यमान नगरसेवक उमेदवारीचे दावेदार मानले जात असले तरी दुप्पट दावेदारांनी अगोदरपासुन फिल्डींग लावल्याने येथेही उमेदवारी वाटपाचे संकट भाजपासमोर उभे राहणार आहे. प्रभाग ५ मध्ये भाजपाच्या ७ विद्यमान नगरसेवकांचा समावेश असुन दावेदारीसाठी इच्छुकांची आणखी भर पडली आहे. त्यामुळे उमेदवारी कोणाला मिळणार, हे पहावे लागणार आहे. प्रभाग १० व ११ मध्ये सेनेचाच प्रभाव असला तरी त्यात यंदा अनुसूचित जातीसाठी एक जागा राखीव ठेवण्यात आल्याने सेनेला या आरक्षण प्रवर्गातील उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे. मीरारोड येथील प्रभाग ९, १९ व २२ मध्ये काँग्रेसचा प्रभाग असला तरी प्रभाग २१ मध्ये भाजपाच्या नगरसेवकांचा प्रभाग विलिन झाल्याने काँग्रेसला काट्याची टक्कर करावी लागणार आहे. त्यात काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक प्रमोद सामंत यांना भरपुर कसरत करावी लागणार आहे. मीरारोड येथीलच गोल्डन नेस्ट ते पश्चिम महामार्गादरम्यान पुर्वीच्या एकाच प्रभागातुन ३ प्रभागांची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रभागातुन गतवेळच्या निवडणुकीत भाजपा आ. नरेंद्र मेहता निवडणुक आल्याने त्यांचा या प्रभागावर पगडा कायम राहण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महामार्गावरील काजुपाडा ते दहिसर चेकनाका दरम्यान एकच प्रभाग निश्चित झाला आहे. त्यात सेनेचा प्रभाव असला तरी मध्यस्थानी असलेला काशीगाव येथील भाजपाचा प्रभाव सेनेला मारक ठरण्याची शक्यता आहे. एकंदरच आयारामांमुळे सेना-भाजपांत इच्छुकांची संख्या वाढली असुन त्यापैकी भाजपात मोठ्याप्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसला मीरारोडचे प्रभाग हाताशी धरावे लागणार असुन राष्ट्रवादी व मनसेला तर खंबीर नेतृत्वच नसल्याने या पक्षाचे किती उमेदवार निवडुन येणार, हे पहावे लागणार आहे. त्यातच बहुजन विकास आघाडीतील तीन नगरसेवक भाजपाच्या कमळावर विसावल्याने बविआचे अस्तित्वालाच धक्का लागल्याचे बोलले जात आहे. ४ उमेदवारांच्या पॅनलप्रमाणे आरक्षण निहाय प्रभाग रचनाप्रभाग १ - खुल्या प्रवर्गासाठी २, इतर मागासवर्गीयांसा व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी १ जागा. प्रभाग २ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग ३ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग ४ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग ५ - सर्वसाधारण प्रवर्गातील व इतर मागासवर्गीय सर्वसाधारण महिलांसाठी प्रत्येकी १, खुल्या प्रवर्गासाठी २ जागा.प्रभाग ६ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग ७ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग ८ - सर्वसाधारण प्रवर्गातील व इतर मागासवर्गीय महिलांसाठी प्रत्येकी १, खुल्या प्रवर्गासाठी २ जागा.प्रभाग ९ - सर्वसाधारण प्रवर्गातील व इतर मागासवर्गीय महिलांसाठी प्रत्येकी १, खुल्या प्रवर्ग व इतर मागासवर्गातील सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग १० - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग ११ - सर्वसाधारण प्रवर्ग व इतर मागासवर्गीय महिलांसाठी प्रत्येकी १, व खुला प्रवर्ग व अनुसूचित जातीमधील सर्वसाधारण प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग १२ - खुल्या प्रवर्गासाठी २, इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग १३ - खुला प्रवर्ग, सर्वसाधारण प्रवर्गातील व अनुसूचित जाती प्रवर्गाती महिलांसाठी प्रत्येकी १, इतर मागासवर्गीयांसाठी १ जागा.प्रभाग १४ - अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी १, खुला प्रवर्ग व इतर मागासवर्गीयांसाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग १५ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग १६ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २, इतर मागासवर्गीय महिलांसाठी १ व खुल्या प्रवर्गासाठी १ जागा.प्रभाग १७ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग १८ - सर्वसाधारण प्रवर्ग व इतर मागासवर्गीय प्रवर्गातलि महिलांसाठी प्रत्येकी १, अनुसूचित जातीमधील सर्वसाधारण प्रवर्ग व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग १९ - इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी १, खुल्या प्रवर्गासाठी २ जागा.प्रभाग २० - इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी १, खुल्या प्रवर्गासाठी २ जागा.प्रभाग २१ - इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी १, खुल्या प्रवर्गासाठी २ जागा.प्रभाग २२ - इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी १, खुल्या प्रवर्गासाठी २ जागा.प्रभाग २३ - सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २, इतर मागासवर्गीय व खुल्या प्रवर्गासाठी प्रत्येकी १ जागा.प्रभाग २४ - इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी प्रत्येकी १, खुल्या प्रवर्गासाठी २ जागा.
आगामी पालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आरक्षण सोडतीत ४६ जागा महिलांसाठी राखीव
By admin | Published: May 02, 2017 8:35 PM