अलिबाग : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा ता. अलिबाग जि. रायगड यांच्या सौजन्याने संपूर्ण रायगड जिल्ह्यात रविवारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानाचे राज्यपालांनी नियुक्त केलेले स्वच्छतादूत आणि प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली.संपूर्ण रायगड जिल्ह्यात या स्वच्छता मोहिमेंतर्गत १५ तालुक्यांतील सुमारे ४६२ ग्रामपंचायतींमध्ये १,०३७ कि.मी. लांबीचे रस्ते, शाळा, सरकारी कार्यालये, बस स्थानके, समुद्रकिनारे येथे स्वच्छता करण्यात आली. ९६,५९५ स्वयंसेवकांचा समावेश असलेल्या मानवी साखळीने अभियान यशस्वीपणे पार पाडले. १,२१२ टन कचरा जमा करण्यात आला. हे संपूर्ण अभियान अंमलात आणताना प्रशासनाचे सहकार्य घेण्यात आले. परंतु कोणताही अतिरिक्त बोजा पडणार नाही याची दक्षता घेण्यात आली. हातमोजे, झाडू, मास्क, कचरा उचलण्याचे साहित्य प्रतिष्ठानतर्फे पुरविण्यात आले. जमा केलेला कचरा सरकारी अथवा खासगी वाहनांतून डम्पिंग ग्राउंडपर्यंत पोहोचविण्यात आला. सर्वच ठिकाणी ग्रामस्थांचा, सरपंच, अधिकारीवर्गाचा सहभाग आणि सहकार्य फारच उत्साहवर्धक होते. अलिबाग येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील उपस्थित होते. ‘डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान’ हे एक समाजाभिमुख उपक्रम राबविणारे प्रतिष्ठान आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी प्रतिष्ठानतर्फे समाजोपयोगी उपक्रम साकारत आहे. वृक्षारोपण आणि संगोपन, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे विनामूल्य वाटप, रक्तदान शिबिरे, नि:शुल्क आरोग्य निदान आणि उपचार, आरोग्यविषयक जनजागृती शिबिरे, पाणपायांची निर्मिती, बसथांब्यावर निवाऱ्यांची निर्मिती, कालवे, सरोवरे, नद्या आणि धरणांतील गाळ बाहेर काढणे, स्पर्धा परीक्षा आणि व्यवसायासाठी मार्गदर्शन शिबिरे, दुर्घटनाग्रस्त व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, शारीरिकदृष्ट्या अक्षम आणि मूकबधिर व्यक्तींना आवश्यक अवयव व उपकरणांचे वाटप आदी उपक्रमांबरोबरच बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये पहिल्यांदाच राबविण्यात आलेले कुरण व्यवस्थापन हे उल्लेखनीय कार्य आहे. (विशेष प्रतिनिधी)
धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे ४६२ ग्रामपंचायतींत स्वच्छता अभियान
By admin | Published: January 12, 2015 3:19 AM