मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांना त्यांच्या उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी राष्ट्रपती, तसेच पोलीस पदकाने राज्य पाल के. सी . राव यांच्या हस्ते मंगळवारी सन्मानित करण्यात आले. राज्य पोलीस मुख्यालयात हा कार्यक्रम पार पडला. कुलाबा येथील राज्य पोलीस मुख्यालयात आयोजिलेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक सतीश माथुर, मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी, तसेच पदक मिळालेल्या अधिकारी, अंमलदारांच्या कुटुंबीयांनी या समारंभास उपस्थिती दर्शविली. पोलीस दलात काम करताना अशा प्रकारे सन्मानित केले गेल्याने, अधिक आनंद झाल्याचे अधिकारी, अंमलदारांसह त्यांच्या कुटुंबीयांनी या वेळी बोलताना सांगितले. न्यायिक व तांत्रिक विभागाचे महासंचालक प्रभात रंजन यांच्यासह मुंबई पोलीस दलातील सशस्त्र पोलीस बल, नायगावचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त जनार्दन ठोकळ आणि विशेष शाखेचे सेवानिवृत्त सहायक आयुक्त दिलीप घाग यांना राष्ट्रपती पदकाने सन्मानित करण्यात आले आहे, तर पोलीस खात्यामध्ये गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठी अपर महासंचालक प्रशासन डॉ. प्रज्ञा सरवदे, व्ही.व्ही.आय.पी. सुरक्षा विभागाचे विशेष महासंचालक कृष्ण प्रकाश आणि राज्य राखीव पोलीस बल नागपूरचे विशेष महासंचालक प्रकाश मुत्याळ यांच्यासह राज्य पोलीस दलातील ४४ अधिकारी आणि अंमलदारांना पोलीस पदक देऊन सन्मानित करण्यात आले. (प्रतिनिधी)
४७ पोलिसांना राष्ट्रपती आणि पोलीस पदके प्रदान
By admin | Published: February 01, 2017 2:30 AM