मुंबई : मुंबईतील खड्ड्यांनी सर्व स्तरावर महापालिकेची नाचक्की केल्यावर प्रशासन आता कामाला लागले आहे. पाऊस थांबल्यामुळे येत्या ४८ तासांमध्ये म्हणजेच सोमवारपर्यंत सर्व खड्डे बुजवण्याची ताकीद आयुक्त अजय मेहता यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. त्याचबरोबर आॅक्टोबर अखेरपर्यंत मुंबईत सुरू होणाऱ्या तीनशे रस्त्यांच्या कामावर स्वत: रस्त्यावर उतरून लक्ष ठेवण्यास उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना बजाविण्यात आले आहे. त्यामुळे खड्डे भरण्याचे काम वीकेण्डलाच युद्धपातळीवर सुरू आहे.खड्ड्यांवरून राजकीय वातावरण तापले आहे. महापालिकेच्या आगामी निवडणुकीमुळे सर्वच पक्षांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावर उडी घेतली आहे. मनसेने रस्ते विभागाच्या प्रमुख अभियंत्याला खड्ड्यात उभे करून, ‘मी या खड्ड्यांना जबाबदार आहे’ अशी पाटी हातात दिली होती. काँंग्रेस आणि राष्ट्रवादीनेही खड्डे मोजण्याचे आंदोलन छेडले. अशी सर्वच स्तरांतून टीकेची झोड उठत असल्याने पालिका प्रशासनाचे धाबे दणाणले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी साहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांनाच रस्त्यावर उतरवले आहे.पावसाने विश्रांती घेतल्यामुळे खड्डे बुजवण्याचे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश आयुक्तांनी शुक्रवारी संध्याकाळी घेतलेल्या आढावा बैठकीतून अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये अधिकाऱ्यांना ठेकेदार व कामगारांकडून खड्डे बुजवून घ्यावे लागणार आहेत. ४८ तासांच्या मुदतीत काम होण्यासाठी रात्रीच्या वेळेतही खड्डे बुजवले जात आहेत. मात्र या कामास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)निवडणुकीपर्यंत एक हजार नवीन रस्ते- शंभर नवीन रस्त्यांची कामे येत्या सोमवारपासून हाती घेण्यात येणार आहेत. तसेच आॅक्टोबर अखेरपर्यंत आणखी २०० रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत.- २०१६-१७ या आर्थिक वर्षात मुंबई महापालिका क्षेत्रात एकूण १ हजार ४ रस्ते तयार करण्यात येणार आहेत. यापैकी ३०० रस्त्यांची कामे आॅक्टोबर अखेरपर्यंत तर उर्वरित रस्त्यांची कामे ३१ मे २०१७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत. ठेकेदारांवर कारवाई : हमी कालावधीतील रस्त्यांचे काम त्या-त्या ठेकेदारांकडून करून घेण्यात येणार आहे. ही कामे करण्यास ठेकेदार टाळाटाळ करत असल्यास कामगारांमार्फत खड्डे बुजविण्यात येतील. मात्र या कामाचा खर्च त्या ठेकेदाराकडून वसूल करण्यात येईल व त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वॉच : रस्त्यांची कामे सुरू असलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स लावणे, सूचना फलक लावण्याची ताकीद ठेकेदारांना देण्यात आली आहे. तसेच रस्ते घोटाळ्यावरून शहाणे झालेल्या प्रशासनाने रस्त्याच्या कामाचा दर्जा, कामे वेळापत्रकानुसार व गुणवत्तापूर्ण होतील यावर लक्ष देण्यासाठी परिमंडळीय उपायुक्त व साहाय्यक आयुक्त यांना काम सुरू असलेल्या ठिकाणांची नियमित झाडाझडती घेण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
खड्डे बुजवण्यासाठी ४८ तासांची मुदत
By admin | Published: October 16, 2016 2:37 AM