मुंबई : महावितरणचा कारभार पारदर्शी होण्यासह वीजग्राहकांना कमीत कमी वेळेत वीजजोडणी उपलब्ध व्हावी आणि गाऱ्हाणे मांडता यावे, यासाठी महावितरणने कार्यान्वित केलेल्या अॅप्सला वीजग्राहकांकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत अॅप्सद्वारे ४८ हजार ९६७ नव्या ग्राहकांना वीजजोडणी देण्यात आली आहे.राज्यभरातील वीजग्राहक व कर्मचाऱ्यांसाठी महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ‘मोबाइल अॅप’ला वीजग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अॅप कार्यान्वित झाल्यानंतर अवघ्या पंधरा दिवसांत सुमारे ३ लाखांहून अधिक ग्राहकांनी हे ‘मोबाइल अॅप’ डाउनलोड केले होते, शिवाय नवीन वीजजोडणीसाठी अर्ज केलेल्या सोलापूर जिल्ह्यातील ३२ ग्राहकांना मोबाइल अॅपच्या माध्यमातून सर्व प्रक्रिया पूर्ण करून केवळ २४ तासांमध्ये वीजजोडणी देण्यात आली होती. राज्यात इतर ठिकाणी अशाच प्रकारे वीजजोडणी देण्यात येत आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान विधानपरिषदेत आमदार नीलम गोऱ्हे यांनी महावितरणच्या अॅप्सवर कौतुकाचा वर्षावर करत, मोबाइल अॅप्समुळे राज्यातील ग्राहकांना तत्पर आणि आॅनलाइन सेवा मिळत असल्याचे नमूद केले, असे महावितरणच्या वतीने सांगण्यात आले. (प्रतिनिधी)विविध सेवा आॅनलाइन, विशेषत: मोबाइलवर उपलब्ध व्हाव्यात, म्हणून महावितरणने वीजग्राहकांना ‘मोबाइल अॅप’ची सुविधा दिली आहे. यात विविध पर्यायाद्वारे, वीजबिलाचे रीडिंग न घेतल्यास, ग्राहकाला स्वत: फोटोद्वारे आपल्या वीजबिलाचे रीडिंग पाठविण्याची सुविधा देण्यात आली आहे. शिवाय नवीन वीजजोडणीसाठी अर्ज करण्याची, तसेच वीजबिलांचा भरणा, वीजसेवांबाबत तक्रारी इत्यादी महत्त्वाच्या सुविधाही देण्यात आलेल्या आहेत.
अॅप्सद्वारे ४८ हजार ९६७ वीजग्राहकांना जोडणी
By admin | Published: April 03, 2017 3:11 AM