मुंबई - सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगानं इलेक्टोरल बॉन्डच्या नंबरसह राजकीय पक्ष आणि त्यांना देणगी देणाऱ्या कंपन्यांची नावे सार्वजनिक केली आहेत. या देणगीदार कंपन्यांमध्ये एक नाव अल्लाना ग्रुप विशेष आहे. कारण हलाल बोनलेस बफेलो मीट विक्री करणारे सर्वात मोठे उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या अल्लाना ग्रुप निगडीत कंपन्यांनी २०१९ मध्ये ६ आणि २०२० मध्ये १ बॉन्ड खरेदी केला. ज्यात शिवसेना, भाजपा या राजकीय पक्षांना फायदा झाला.
Allana कोल्ड स्टोरेजनं ७६५१ नंबरचा बॉन्ड जुलै २०१९ मध्ये खरेदी केला होता. त्याची किंमत १ कोटी इतकी होती. या नंबरचा बॉन्ड शिवसेनेला ११ जुलै २०१९ रोजी दिला. त्यानंतर Allana Sons प्रायव्हेट लिमिटेडने ७६५५ नंबरचा बॉन्ड ९ जुलै २०१९ रोजी खरेदी केला. त्याची किंमतही १ कोटी होती. हा बॉन्डही शिवसेनेला देण्यात आला. अशाप्रकारे अल्लाना ग्रुपच्या विविध कंपन्यांनी ५ कोटी रुपयांचा बॉन्ड ११ जुलै २०१९ रोजी शिवसेनेला दिला. तसेच Frigerio Conserva AL ने ७७७२ नंबरचा बॉन्ड २२ जानेवारी २०२० रोजी खरेदी केला होता. त्याची किंमत १ कोटी होती. त्याचसोबत Allana Sons कडूनही १ कोटींचा बॉन्ड ३ फेब्रुवारीला भाजपाला देण्यात आला.
कन्स्ट्रशन कंपनीकडून शिवसेनेला सर्वाधिक बॉन्ड
शिवसेनेला सर्वाधिक देणगी देणारी बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्स टेक्नोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी बांधकाम क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी आहे. या कंपनीने शिवसेनेला ८५ कोटी आणि २०२३-२४ दरम्यान भाजपाला ३० कोटी रुपये दिले आहेत. गेल्या वर्षी बी. जी. शिर्के कंस्ट्रक्शन्सला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राज्यामध्ये २०४४८ फ्लॅट्सचं ४६५२ कोटींचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे.