ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 11 - राज्यामध्ये रेल्वे मार्गांवर मोठा घातपात घडवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे दिसत आहे. आता नाशिकमध्येही रेल्वे रुळांवर पाच फूट उंच दगड आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना समोर आली. खेरवाडी- ओढादरम्यान पाच फूट उंच दगड रेल्वे रुळावर ठेवण्यात आला होता. हा दगड ट्रॅकवर कोणी ठेवला याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. रेल्वे पोलीस याबाबतची चौकशी करत आहेत. दरम्यान, यापूर्वी नवी मुंबई, अकोलामध्ये रेल्वे रुळांवर उंच दगड आढळले होते.
पनवेल-तळोजा रेल्वेमार्गावर जिलेटीन
पनवेल तळोजा मार्गावर 9 फेब्रुवारीला सकाळी जिलेटीनच्या साडेतीन काड्या ठेवलेल्या आढळल्या. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यातील रेल्वेरूळ परिसरात घडलेली ही सलग तिसरी घटना आहे.
रेल्वे रुळावर विजेचा खांब
पनवेल : 8 फेब्रुवारीला गव्हाणफाटाजवळ रेल्वे रुळावर विजेचा खांब ठेवण्यात आला होता. पनवेलवरून उरणला जाणाऱ्या मालवाहू गाडीच्या रुळावर कोपर येथे मोठा विजेचा खांब आडवा ठेवल्याने अचानक रेल्वेचा वेग मंदावला. यावेळी चालकाने खाली उतरून पाहिले असता, मोठा विजेचा खांब रुळावर ठेवल्याचे निदर्शनास आल्याने, त्यांनी त्वरित पोलिसांना याबाबत कळविले.विशेष म्हणजे, दोन दिवसांपूर्वीच कळंबोली परिसरात रेल्वे रुळावर लोखंडी रॉड ठेवल्याची घटना समोर आली होती.
दिवा घातपाताची उकल होईना
दिवा स्टेशन जवळ (दिवा फाटकापासून 700 मीटर अंतरावर) 25 जानेवारी रोजी एक मोठा अपघात टळला होता. रुळावर सात मीटर लांबीचा रुळाचा तुकडा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, जनशताब्दी एक्स्प्रेसच्या लोको पायलटने प्रसंगावधान दाखवत ट्रेन थांबवली. या घटनेनंतर घातपाताची शक्यता लक्षात घेता, लोहमार्ग पोलीस आणि शहर पोलिसांनी तपासास सुरुवात केली. मात्र, अद्यापही पोलिसांना कोणताही सुगावा लागलेला नाही. आतापर्यंत 30 संशयितांची चौकशी करण्यात आली आहे.
मात्र वारंवार घडणाऱ्या घटनेमागे घातपात नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे रेल्वे सुरक्षेचा प्रश्नदेखील ऐरणीवर आला आहे.