मुंबई : केंद्र सरकारने २३ तारखेपासून ब्रिटनहून येणारी विमाने बंद केली आहेत. मात्र, आज आणि उद्या मुंबईत ५ विमाने येणार आहेत. य़ामध्ये अंदाजे १००० प्रवाशी असतील. त्यांच्यासाठी ताज, ट्रायडंट आदी हॉटेलमध्ये २००० रुम बुक करण्यात आले आहेत, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी सांगितले.
राज्यात उद्यापासून नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. या काळात अत्यावश्य़क सेवा सुरु राहतील. मात्र, ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ शकणार नाहीत. मुंबई महापालिकेने तातडीने लंडनहून येणाऱ्या प्रवाशांसाठी तयारी केली आहे. दोन फ्लाईट आज रात्री येणार, दोन उद्या सकाळी आणि एक रात्री ११ वाजता येणार आहे. यामध्ये संशयित प्रवाशांना थेट सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. यासाठी तिथे 100 बेड आरक्षित ठेवण्यात आले आहेत. या प्रवाशांना बेस्ट ट्रान्सपोर्ट करणार आहे, असे चहल यांनी सांगितले.
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा (स्ट्रेन) हाहाकार लक्षात घेऊन खबरदारी म्हणून राज्यात उद्यापासून रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. राज्यात कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षावर तातडीची बैठक बोलावली होती. यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.
संपूर्ण युरोपीय देशांसह मध्य-पूर्व देशांकडून महाराष्ट्रात उतरणाऱ्या प्रवाशांना आजपासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन बंधनकारक करण्यात आले आहे. अशा प्रवाशांना क्वारंटाईन केल्यानंतर त्यांची पाचव्या अथवा सातव्या दिवशी कोरोनाची चाचणी (आरटीपीसीआर) केली जाईल. त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल. ज्या विमानतळांवर आंतरराष्ट्रीय विमाने उतरतात तेथील महापालिका आयुक्तांनी अशा प्रवाशांना क्वारंटाईन करण्यासाठी हॉटेल आणि स्वतंत्र हॉस्पीटलची व्यवस्था करावी. त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
अन्य देशांमधून आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.