मुंबई : कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवली जाईल. तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा बालसंगोपन योजनेतून खर्च उचलण्यात येईल, असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला.१ मार्च २०२० रोजी व त्यानंतर कोरोनामुळे दोन्ही पालक (आई व वडील) मृत्यू पावलेले, किंवा एका पालकाचा कोरोनामुळे व अन्य पालकांचा इतर कारणामुळे मृत्यू झाला असल्यास किंवा एका पालकाचा (१ मार्च २०२०) पूर्वीच मृत्यू झाला असेल व त्यानंतर एका पालकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल, अशा बालकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. बालकाला बालगृहामध्ये किंवा संबंधित बालकांच्या नातेवाईंकाकडून संगोपन अशा दोन्ही पद्धतीत संबंधित बालकाच्या नावे एकरकमी पाच लाख रुपये मुदत ठेव म्हणून ठेवण्यात येईल. ठेवीची ही रक्कम बालकाची २१ वर्षे पूर्ण झाल्यानंतर व्याजासह मिळेल.कोरोनाच्या महामारीने दोन किंवा एक पालक गमावलेल्या बालकांची जबाबदारी आजच्या निर्णयाने राज्य शासनाने स्वीकारली आहे. त्यांच्या संगोपनात आम्ही कुठेही कमी पडणार नाही. - यशोमती ठाकूर मंत्री महिला व बालविकास किती आहेत बालक? कोरोनाने एक पालक गमावलेल्या बालकांची राज्यातील संख्या ५०९६ आहे. दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या १४३ आहे....तर अनुदान मिळेल केंद्र सरकारच्या पीएम केअर योजनेतूनही अशीच योजना राबविण्यात येत आहे. पण त्याव्यतिरिक्तची योजना म्हणून महाराष्ट्र शासन ही योजना राबविणार आहे. बालकाचे संगोपन करण्यास नातेवाईक पुढे आले तर त्यांना महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेतून अनुदान दिले जाईल.
कोरोनामुळे अनाथ झालेल्यांना दिलासा; ‘त्या’ बालकांच्या नावे ५ लाखांची एफडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 7:46 AM