मुंबई - महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आरक्षणासंदर्भातील घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी विधान परिषदेत केली आहे.
मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार अध्यादेश काढणार असल्याचे अल्पसंख्यांक मंत्री मलिक म्हणाले. आधीच्या भाजप सरकारने मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिले नव्हते. मात्र हे सरकार आरक्षण देणार असल्याचा पुनरोच्चार त्यांनी केला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र विधानसभेचे बजेट सत्र समाप्त होण्यापूर्वी मुस्लिमांना आरक्षण देण्यात येणार आहे. मुस्लिमांना आरक्षण देण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर देखील मागच्या भाजप सरकारने यासाठीचा अध्यादेश काढला नव्हता. दरम्यान मुस्लिमांना नोकरीतही आरक्षण देण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यात येत असून लवकरच त्यावर निर्णय होईल, असंही मलिक यांनी सांगितले आहे.
याआधी आघाडी सरकारने 2014 मध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. त्यासाठी अध्यादेशही जारी करण्यात आला होता. मात्र ते आरक्षण नवीन सरकारच्या काळात कायम राहिले नाही.