पुणे : रुपी बँकेतून २० हजार रुपये खातेदारांना देण्यास रिझर्व्ह बँकेने मान्यता दिलेली असतानाही नव्या प्रशासकीय मंडळाने खातेदारांना केवळ ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती पुणेकर नागरिक कृती समितीचे अध्यक्ष मिहीर थत्ते यांनी दिली आहे.फेब्रुवारी महिन्यात रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेस खातेदारांना २० हजार रुपये देण्यास मान्यता दिली होती. गेल्या अनेक वर्षांपासून पैसे अडकून पडल्याने मेटाकुटीस आलेल्या खातेदारांमध्ये यामुळे आनंदाचे वातावरण होते. मार्च महिन्यात हे पैसे वाटपास सुरुवात होणार होती. मात्र २० हजार रुपये देण्यावरून प्रशासकीय मंडळात झालेल्या वादावादीमुळे आणि राजीनामानाट्यामुळे खातेदारांना पैसेच मिळाले नव्हते. त्यामुळे नवे प्रशासकीय मंडळत तरी पैसे देईल, अशी आशा खातेदार लावून बसले होते. मात्र नव्या मंडळाने केवळ ५ हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या प्रशासकीय मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांनी खातेदारांना २० हजार रुपये मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे त्यांचा नव्या प्रशासकीय मंडळात समावेश असावा, अशी आग्रही मागणी पुणेकर नागरिक कृती समितीची होती. मात्र नव्या नियुक्त्या करताना सहकार आयुक्तांनी अभ्यंकरांना घेतलेले नाही. यावरून या मागणीकडे आयुक्तांनी दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान खातेदार पैसे परत मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. (प्रतिनिधी)
‘रुपी’च्या खातेदारांना मिळणार ५ हजार रुपये
By admin | Published: April 27, 2016 1:54 AM