पालघर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीत इच्छुकांची भाऊगर्दी झालेली आहे. यातच मनसेनं राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याची घोषणा केली. त्यामुळे अनेक इच्छुक मनसेकडेही पर्याय म्हणून पाहत आहेत. पालघर तालुक्यातील काँग्रेसचे २ प्रमुख पदाधिकारी येत्या १३ ऑक्टोबरला मनसेत प्रवेश करणार आहेत. यात माजी खासदार दामू शिंगडा यांचे सुपूत्र सचिन शिंगडा यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष सचिन शिंगडा, नरेश कोरडा हे पदाधिकारी समर्थकांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश करणार आहेत. सचिन शिंगडा हे विक्रमगड मतदारसंघातून तर नरेश कोरडा पालघरमधून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. विक्रमगडमध्ये विद्यमान आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील भुसारा हे आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला जाण्याची शक्यता कमी आहे. त्यातूनच सचिन शिंगडा यांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. तर नरेश कोरडा हे पालघरमधून विधानसभा लढवण्यास इच्छुक आहेत.
कोण आहेत सचिन शिंगडा?
सचिन शिंगडा हे माजी खासदार दामोदर शिंगडा यांचे सुपूत्र आहेत. दामोदर शिंगडा हे पूर्वीच्या डहाणू लोकसभा मतदारसंघाचे तब्बल ५ वेळा खासदार राहिले आहेत, त्याशिवाय काँग्रेस जिल्हाध्यक्षपदही भूषवलं आहे. शिंगडा कुटुंबाचे विक्रमगड भागात मोठा जनसंपर्क आहे. पोशेरी शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शाळा, महाविद्यालये सुरू करून दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे उघडी करून दिली. सचिन शिंगडा हे पालघर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत. काँग्रेसच्या युवक संघटनेचे ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, लोकसभा युवक काँग्रेस सरचिटणीस अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत काँग्रेसकडून तिकीट मिळणार नाही हे कळताच त्यांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, नुकतीच सचिन शिंगडा, नरेश कोरडा यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची त्यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन भेट घेतली. येत्या १३ ऑक्टोबरला मनसेचा राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा मुंबईत होणार आहे या मेळाव्यात सचिन शिंगडा मनसेत प्रवेश करतील. आमदार सुनील भुसारा यांनी मतदारसंघात कुठलीही कामे मार्गी लावली नाहीत. त्यांच्याविषयी जनतेमध्ये नाराजी आहे. मविआत ही जागा काँग्रेसला मिळणार नाही त्यामुळे या भागात मनसे खूप चांगले काम करतेय, त्यामुळे मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे सचिन शिंगडा यांनी सांगितले.