मुंबई: अध्यात्मिक गुरु भय्यूजी महाराज यांनी स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. इंदूरमधील निवासस्थानी भय्यूजींनी आत्महत्या केली. आयुष्यातील ताणतणावांमुळे जीवन संपवत असल्याचं त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत लिहिलं आहे. भय्यूजी महाराजांनी स्वत:वर गोळी झाडल्यावर झालेल्या आवाजानं त्यांचे भक्त त्यांच्या खोलीच्या दिशेनं धावले. त्यावेळी त्यांच्या खोलीचा दरवाजा बंद होता. त्यामुळे दरवाजा तोडून भक्त भय्यूजी महाराजांपर्यंत पोहोचले. यानंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. विशेष म्हणजे आत्महत्येच्या एक तासआधी भय्यूजी महाराजांनी 5 ट्विट केली होती.
भय्यूजी महाराजांनी त्यांच्या शेवटच्या ट्विटमध्ये भक्तांना शिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या होत्या. 'मासिक शिवरात्री'ला 'महाशिवरात्री' म्हटलं जातं. मी सर्व भक्तांना या पवित्र दिवसाच्या शुभेच्छा देतो', असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. याशिवाय त्यांनी आणखी दोन ट्विटमधून महाशिवरात्रीचं महत्त्व सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी पद्मविभूषण गोपीनाथ कविराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना अभिवादन करणारं एक ट्विटही आत्महत्येच्या तासाभरापूर्वी केलं होतं. यासोबतच कवी सी. नारायण रेड्डी यांना अभिवादन करणारं ट्विटही त्यांनी केलं होतं. आत्महत्येपूर्वी भय्यूजी महाराजांनी ही पाच ट्विट केली होती.