औरंगाबाद : किरकोळ कारणावरून हाणामारी करणा-या उभय पक्षांनी पुढील पाच वर्षांपर्यंत ग्रामपंचायतीमार्फत गावात राबविल्या जाणा-या स्वच्छता मोहीम, वृक्षारोपण, साक्षरता अभियान आदी समाजकार्यांत पुढाकार घेऊन कामे करावीत. तशी कामे केल्याचे सरपंचांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र दर महिन्याला तलाठ्याकडे सादर करावे. तसेच उभय पक्षातील सात जणांनी प्रत्येकी एक हजार रुपये शास्ती (कॉस्ट) म्हणून खंडपीठातील विधिसेवा उपसमितीकडे जमा करावेत, असे आदेश न्या. प्रसन्न बी. वराळे आणि न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठाने दिले.बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील चांदापूर ग्रामपंचायत निवडणुकीत परस्पर विरोधी पॅनल उभे करण्याच्या कारणावरून श्रीहरी गीते आणि कल्याण गीते यांच्या गटाने (भाऊबंदांनी) परस्परांना जबर मारहाण करून गंभीर जखमी केले होते. दोन्ही पक्षांविरुद्ध गंभीर दुखापत करणे, मारहाण, मुंबई पोलीस कायदा आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले होते, तर कल्याण गीते गटाविरुद्ध ‘अॅट्रॉसिटी’ कायद्याखाली गुन्हा दाखल झाला होता.लेखी हमीपत्राच्या अटीवर अर्ज मंजूरगावात शांतता नांदावी, कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न उपस्थित होऊ नये, त्याचप्रमाणे उभयपक्षातील वैमनस्य कायमचे संपुष्टात यावे यासाठी गावातील प्रतिष्ठितांनी पुढाकार घेऊन उभयपक्षामध्ये तडजोड घडवून आणली व त्यांनी परस्परांविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी त्यांचे मन वळवले. त्यावरून उभयपक्षांनी परस्परांविरुद्धच्या तक्रारी मागे घेण्यासाठी खंडपीठात अर्ज केले होते. पाच वर्षांपर्यंत समाजकार्य करण्याचे लेखी हमीपत्र देण्याच्या अटीवर खंडपीठाने उभयपक्षांचे अर्ज मंजूर केले.
हाणामारी करणा-यांना ५ वर्षे समाजकार्याची शिक्षा; लेखी हमीपत्राच्या अटीवर अर्ज मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 1:45 AM