ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 6 - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ह्यड्रीमह्ण असलेल्या ५०-५० परीक्षा प्रणालीला परत एकदा हादरा बसला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी प्रणालीच्या अंमलबजावणीला जोरदार विरोध केला आहे. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने तूर्तास ही प्रणाली न लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी विद्वत्त परिषदेने मान्यता दिल्यानंतर ६० : ४० परीक्षा प्रणालीचा प्रस्तावदेखील महाविद्यालयांच्याच विरोधामुळे मावळला होता.नागपूर विद्यापीठाची परीक्षा प्रणाली प्रशासनासाठी सर्वात मोठी समस्या झाली आहे. त्यातच पदवी अभ्यासक्रमांनादेखील सत्र प्रणाली लागू झाल्यामुळे परीक्षा विभागावरील ताण प्रचंड वाढला आहे. हा ताण कमी व्हावा यासाठी महाविद्यालयांतदेखील परीक्षा सुरू करण्याचा कुलगुरूंचा मानस होता. यासंदर्भातील प्रस्ताव विद्वत्त परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला. याला मंजुरी देण्यात आली होती. नवीन शैक्षणिक सत्रापासून या प्रणालीची अंमलबजावणी करायची की नाही, यासंदर्भात विचारणा करण्यासाठी गैरव्यावसायिक महाविद्यालयांच्या प्राचार्यांची मंगळवारी दीक्षांत सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली.कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे व प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी यावेळी महाविद्यालयांसमोर या प्रणालीबाबत सादरीकरण केले. मात्र अनेक महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या प्रणालीबाबत नाराजीचा सूर लावला. या प्रणालीत एका सत्राची परीक्षा विद्यापीठ तर एका सत्राची परीक्षा महाविद्यालय घेईल, असे प्रस्तावित होते. अनेक महाविद्यालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ नाही. अशा स्थितीत महाविद्यालयांचे काम प्रभावित होईल व प्राध्यापकांना दुप्पट काम करावे लागेल. शिवाय ग्रामीण भागांमध्ये महाविद्यालयांवर पेपर मॅनेज करण्याबाबत दबाव येईल, अशा आशयाची कारणे यावेळी प्राचार्यांकडून मांडण्यात आली. महाविद्यालयांकडून येणारा एकूण नकारार्थी सूर लक्षात घेता, संबंधित प्रणाली तूर्तास लागू न करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतला.
50-50 परीक्षाप्रणालीला महाविद्यालयांचा ब्रेक, नागपूर विद्यापीठ बॅकफूटवर
By admin | Published: June 06, 2017 10:38 PM