अहमदनगर - राज्यातील सत्ताधारी असलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्यामहाविकास आघाडीकडे तब्बल १७० आमदारांचा भक्कम पाठिंबा असल्याचा दावा या तिन्ही पक्षांच्या नेत्यांकडून करण्यात येत असतो. मात्र मविआमधील अनेक आमदार नाराज असून, ते विरोधात मतदान करतील म्हणून विधानसभा अध्यक्षांची निवडणूक गुप्त ऐवजी आवाजी मतदानाने घेण्याचा प्रयत्न राज्यातील सत्ताधाऱ्यांकडून होत आहे, असा दावा भाजपाचे नेते करत असतात. दरम्यान, महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांत मिळून नेमके किती आमदार नाराज आहेत याचा आकडाच भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितला आहे. महाविकास आघाडीमध्ये सुमारे ५० ते ६० आमदार नाराज असल्याचा दावा, चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
शिर्डीमध्ये आलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील सुमारे ५० ते ६० आमदार नाराज आहेत. म्हणूनच विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी नियमात बदल करून गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदानाचा घाट सरकारने घातला होता. गुप्त मतदानाचा कायदा असताना आवाजी मतदानाचा नियम करण्याची गरज का पडली? असा सवाल चंद्रशेखर बावकुळे यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री १६ महिने भेटत नसतील. कामे होत नसतील तर आणखी काय होणार असा टोलाही बावनकुळे यांनी यावेळी महाविकास आघाडी सरकारला लगावला. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये धमक असेल तर त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेऊन दाखवावी, असे आव्हानही बावनकुळे यांनी दिले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात होऊ शकली नाही. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणार अशी चर्चा होती. मात्र अध्यक्षांच्या निवडीच्या प्रक्रियेबाबत राज्यपालांनी आक्षेप घेतल्यानंतर सत्ताधारी महाविकास आघाडीला ही निवडणूक गुंडाळावी लागली.