मुंबई : राज्यातील मेळघाटमधील हरिसाल हे गाव मायक्रोसॉफ्टच्या सहकार्यातून पहिले डिजिटल व्हिलेज ठरले आहे. अशाच प्रकारे २०१६ पर्यंत राज्यातील ५० गावे ‘डिजिटल व्हिलेज’ करण्याचे उद्दिष्ट असून मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.मायक्रोसॉफ्ट भारतात सुरू झाल्याच्या २५ व्या वर्षानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सेंटरमध्ये परिषद झाली. त्यात मायक्रोसॉफ्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भास्कर प्रामाणिक यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या परिषदेसाठी मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांच्यासह देश-विदेशातील उद्योजक, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, पूर्वी उद्योग उभारण्यासाठी तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी लागत असे. ७६ परवानग्या घ्याव्या लागत. त्या आमच्या सरकारने ३७ वर आणल्या असून आता त्या २५ वर आणल्या जातील. उद्योगासाठीच्या परवानग्यांसाठी ‘ई-फ्लॅटफॉर्म’ तयार केला आहे. स्मार्ट व्हिलेजबरोबर स्मार्ट एमआयडीसी अंतर्गत राज्यातील उद्योग परिसरही स्मार्ट करण्यात येईल. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने राज्य सक्षम करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. (विशेष प्रतिनिधी)
राज्यात ५० डिजिटल व्हिलेज !
By admin | Published: November 06, 2015 2:26 AM