- प्रशांत तेलवाडकर, औरंगाबादमोबाइलने माहितीतंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांती झाली. सर्वसामान्यांच्या मुठीमध्ये जग आले. मात्र, याच मोबाइलने ५०पेक्षा अधिक व्यवसाय अडगळीत टाकले. काही व्यवसायिकांनी काळासोबत राहून दुसऱ्या व्यवसायात उडी घेतली म्हणून ते तरले.मोबाइल आता नुसता संवाद साधण्यापुरता मर्यादित राहिला नसून तो आता मल्टीयुजर बनला आहे. हँडसेटमध्येच टेलिफोन डायरी, घड्याळ, कॅल्क्युलेटर उपलब्ध करून देण्यात आल्याने बाजारात या वस्तूंच्या मागणीवर विपरीत परिणाम झाला आहे. हँडसेटमध्येच कॅमेरा असल्याने बाजारातील डिजिटल कॅमेऱ्याचा उठावदेखील घटला आहे. फोटो अल्बम, ग्रिटिंग कार्ड, टॉर्च, व्हिडीओ गेम, कार्टून, स्टोरी बुक, डिक्शनरी, पाकशास्त्रावरील पुस्तके, नकाशे आदींवर परिणाम झाला आहे.फोटोग्राफर लग्नसराई समारंभापुरतेच...पूर्वी वाढदिवस, घरगुती समारंभात व्यावसायिक फोटोग्राफरला मोठी मागणी होती. पण मोबाइलमध्येच उच्च दर्जाचा कॅमेरा उपलब्ध झाल्याने, प्रत्येक मोबाइलधारक फोटोग्राफर झाला आहे. मोबाइलमधूनच व्हिडीओ शूटिंग केले जाते. समारंभापुरतेच व्यावसायिक फोटोग्राफर, व्हिडीओ शूटिंग करणाऱ्यांचे महत्त्व राहिले आहे, असे फोटोग्राफर उमाकांत वैद्य यांनी सांगितले.पाच हजार व्यापाऱ्यांवर परिणाम जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष अजय शहा यांनी सांगितले की, औरंगाबादेत लहान-मोठे २५ हजार व्यापारी आहेत. मोबाइलमुळे मागील ५ वर्र्षांत त्यातील जवळपास ५ हजार व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर गदा आली आहे. मात्र, त्यातील काहींनी हा बदल स्वीकारत नवीन व्यवसायात पदार्पण केले आहे.पूर्वी सीडी विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू होता; पण मोबाइलमुळे या विक्रीवर एवढा परिणाम झाला की, आता सीडीच आऊटडेटेड झाल्या आहेत. यामुळे हा व्यवसाय बंद करून आम्ही रेडिमेड कपड्याच्या व्यवसायात पदार्पण केले. - नरेश फुलवाणी, व्यावसायिक
मोबाइलमुळे इंटरनेटद्वारे मेसेज पाठविणे सोपे झाले आहे. याचा मोठा परिणाम ग्रिटिंग विक्रीवर झाला आहे. अनेकांनी आपले जुने व्यवसाय बंद करून वेगळे व्यवसाय थाटले आहेत.- सुहास देशपांडे, ग्रिटिंग विक्रेता