पुणे : राज्यात मुलींसाठी ५० अनुदानित वसतिगृहे उभारण्यात येणार आहेत. तर मुलांसाठी १२५ नव्याने वसतिगृहे सुरू करण्यात येणार असून, उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या राज्यातील १२५ मुला-मुलींना १०० टक्के शिष्यवृत्ती दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.पुणे शहरात कोरेगाव पार्क, येरवडा आणि महंमदवाडी या भागांत सामाजिक न्याय विभागाची ६५ एकर जागा आहे. या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात इमारती भाड्याने घेऊन मुलींसाठी वसतिगृह सुरू करण्यात येणार आहे. शहरांचे रूपांतर महानगरात होत असल्यामुळे गृहिणी कामासाठी मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत आहेत. राज्यातील पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, नागपूर, औरंगाबाद या शहरांमध्ये महिलांसाठी वर्किंग वुमन्स वसतिगृह सुरू करण्यात येणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले़ सध्या अस्तित्वात असलेल्या वसतिगृहांसाठी राज्य शासनाकडून ५०० कोटी रुपयांची वेगळी तरतूद करण्यात आली आहे. या निधीतून इमारतीची डागडुजी, संगणकाची व्यवस्था, खानावळीतील सुविधा अशा स्वरूपाची कामे करण्यात येणार आहेत. वसतिगृहातील खानावळीसाठी ई-निविदा काढून नव्याने कंत्राट देण्यात येणार आहेत. लंडन येथील डॉ. आंबेडकर यांचे वास्तव्य असलेल्या ३ मजली घरातील पहिल्या मजल्यावर त्यांनी हयातीत वापरलेल्या वस्तू जतन करून त्यांचे संग्रहालय करण्यात येणार आहे. याबाबत कांबळे यांनी माहिती दिली.
राज्यात मुलींसाठी ५० वसतिगृहे उभारणार
By admin | Published: October 05, 2015 1:19 AM