मुंबई : निमशहरी आणि ग्रामीण भागांतील अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना इच्छा असूनही परदेशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेता येत नाही. आर्थिक पाठबळाबरोबरच जागृतीच्या अभावामुळे त्यांना शिक्षणाच्या धोपटमार्गावरून चालावे लागते. या मुलांनाही दर्जेदार उच्च शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी रिजेनेसिस बिझिनेस स्कूलने विशेष शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे. आॅनलाइन परीक्षा गुणवत्तेत उत्तीर्ण होणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना रिजेनेसिसकडून ५० टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे, अशी माहिती रिजेनेसिसच्या भारतातील प्रमुख डॉ. रिचा अरोरा यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.क्रोएशियन संन्याशी डॉ. मार्को सरावांझा यांनी दक्षिण आफ्रिकेत काही वर्षांपूर्वी रिजेनेसिस बिझिनेस स्कूलची स्थापना केली. या बिझिनेस स्कूलला विद्यापीठाचा दर्जा असून दक्षिण आफ्रिकेतील ते चौथ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. आता ते भारतातही त्यांचा विस्तार करीत असून भारतातील सर्वसामान्यांना विद्यापीठाकडून चालविण्यात येणाऱ्या एमबीए, बीबीए आदी सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांचा लाभ घेता यावा, यासाठी आॅनलाइन परीक्षेत यंदा २०० विद्यार्थ्यांना ५० टक्क्यांपर्यंत विशेष शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे एमबीएसारख्या दोन वर्षांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी या विद्यार्थ्यांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काविना अभ्यासक्रमाच्या सुरुवातीलाच चार दिवस दुबईला नेण्यात येणार आहे. त्यानंतर ११ महिने विद्यापीठाच्या मुंबईतील कॅम्पसमध्ये शिक्षण घेतल्यानंतर, पुढील एक वर्षाचे शिक्षण दक्षिण आफ्रिकेतील कॅम्पसमध्ये तज्ज्ञांकडून देण्यात येईल, असे हे वेळापत्रक असणार आहे. आफ्रिकेत शिकताना नोकरीची मुभा आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नोकरीची संधी रिजेनेसिस देणार आहे. शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर उर्वरित ५० टक्के रक्कमही जे विद्यार्थी देऊ शकणार नाहीत, त्यांना ५ ते ७ वर्षांच्या सुलभ मासिक हप्त्यांमध्ये ही रक्कम भरण्याची मुभा देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
व्यावसायिक शिक्षणासाठी ५० टक्के शिष्यवृत्ती!
By admin | Published: March 25, 2016 2:40 AM