आकाश गायकवाड, डोंबिवलीकल्याण-डोंबिवली शहरातील पान टपरी, चहा टपरी, छोटे दुकानदार, किरणा दुकानदार यांच्याकडे गुटख्याच्या पुड्यांची खुलेआम विक्र ी सुरू आहे. जेमतेम ७ रुपये किंमतीची गुटख्याची पुडी बंदीमुळे काळाबाजार बोकाळल्याने ५० रुपयांना विकली जाते. त्यामुळे राज्यातील गुटखाबंदी केवळ कागदावर आहे की काय, असा प्रश्न पडला आहे. गुटखाबंदी लागू केली तेव्हा कायद्याचा बडगा उगारण्यात आला. मात्र त्यानंतर गुटखाबंदीची कारवाई केवळ फार्स ठरला. अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या दुर्लक्षामुळे गुटख्याची चोरट्या मार्गाने आयात होते. मग तपास यंत्रणांची नजर चुकवून विक्री केली जाते. लोक चोरीछुपे गुटखा खाऊन प्रकृतीची हेळसांड करीत आहेत आणि सरकार उत्पन्नावर पाणी सोडत असल्याचे चित्र दिसत आहे. सरकारने गुटखाबंदीची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून गुटखा विक्र ी व साठेबाजीत सहभागी असणाऱ्या आरोपींवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. याबाबतचा कायदा इतका कडक होऊनही त्यांची अंमलबजावणी मात्र संबंधित यंत्रणांकडून होताना दिसून येत नाही. त्यामुळे या सर्वच प्रकारात मिलीभगत असल्याचे खुलेआम आरोप सामाजिक संघटनांकडून होत आहे. गुटखाबंदी प्रामाणिकपणे व्हावी, असे जनतेला वाटते. शासनानेही त्यासाठी कायदा बनवला. परंतु, या कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडूनच ढिलाई दाखवली जात असल्याने कायदा कडक असूनही राज्यातील अन्य भागांप्रमाणे कल्याण-डोंबिवलीतही गुटखा विक्र ी केली जात आहे. राज्यातील गुटखा उत्पादन सरकारने कारवाई करून बंद केले. परंतु शेजारील गोवा, कर्नाटक व अन्य राज्यांत गुटखा निर्मितीवर बंदी नाही. तेथे तयार होणारा गुटखा ट्रकमधून जिल्ह्याच्या विविध भागात येत आहे. गुटख्याचे काही मोठे स्टॉकिस्ट शहरात कार्यरत असल्याचीही चर्चा आहे. शासनाने आदेशाचा चाबूक उगारला, की कारवाई करायची, इतरवेळी डोळ््यांवर कातडे ओढून घ्यायचे, असे चित्र आहे.बंदीपूर्वी १०० ते १५० रूपयांचा मिळणारा पुडा आता ५०० ते ६०० रूपयांना विकला जातो. कल्याण-डोंबिवली शहरातही गुटख्याचे गोडावून असल्याची चर्चा विक्रेत्यांकडून कानावर आली. गुटख्याशिवाय राहू न शकणारी व्यक्ती कोणतीही किंमत मोजून खरेदीसाठी तयार होते, असे काही विक्रेत्यांनी सांगितले. पानटपऱ्या व किराणा दुकानांत मिळणारा गुटखा कोण पुरवितो हे अन्न व औषध प्रशासनाला माहिती नसेल, यावर विश्वास बसत नाही. विशेष म्हणजे, न्यायालय, महापालिका कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, प्रशासकीय इमारत, तहसील, पोलीस ठाणे, बस स्थानक व अन्य शासकीय कार्यालय परिसरात दुकान आणि टपऱ्यांवर ग्राहकांना गुटखा आजही सर्रास उपलब्ध होतो.
सात रुपयांच्या गुटख्याच्या पुडीसाठी ५० रुपये
By admin | Published: March 10, 2016 1:58 AM