- अनिरु द्ध पाटील तलासरीच्या बोरीगाव येथील प्रगतिशील शेतकरी यज्ञेश सावे यांनी अडीच एकर क्षेत्रात मिश्रशेतीतून विविध पन्नास प्रकारचा भाजीपाला लागवड करून त्याची बाजारपेठेत विक्री करून नफ्याची शेती केली आहे. त्यांनी बाजारपेठेत मागणी आणि पुरवठ्याचे योग्य गणित जुळवून आणले आहे. त्यांच्या शेतीतील योगदानाबद्दल आतापर्यंत महाराष्ट्र शासन तसेच विविध संस्था आणि दै. ‘लोकमत’तर्फे ठाणे आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले असून त्यांच्या शेतीतील या व्यवस्थापन तंत्राविषयी जाणून घेऊया..मिश्रशेतीद्वारे पन्नासपेक्षा
अधिक पिकं घेण्याची संकल्पना कशी सुचली? ती प्रत्यक्षात कशी आली?
मी सध्या ५५ वर्षांचा असून चाळीस वर्षांपासून शेती आणि शेतीपूरक व्यवसाय करतो. अनेक वर्षांपासून शेतीत वेलवर्गीय, भाजीपाला, फळभाजी, फुलशेती आणि बागायती असे उत्पादन घेतले जाते. मात्र हे वेगवेगळ्या हंगामात आणि कमी-अधिक प्रमाणात होते. उत्पादित मालाची विक्री महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील उंबरगाव या औद्योगिक वसाहतीलगतच्या बाजारपेठेत स्वत: करतो. मी सेंद्रिय शेती करीत असून दर्जेदार उत्पादन घेतो. ही माहिती कळल्यानंतर मागील काही वर्षांपासून माझ्या शेतमालाला ठराविक ग्राहकवर्ग निर्माण झाला आहे.
मिश्रपीक पद्धतीचा फायदा काय? शेतकºयांनी ही पद्धत अवलंबावी का?
मिश्र पद्धतीत विविध शेतमालाचे उत्पादन घेतले जाते. एका पिकाचे उत्पादन घटले तरी अन्य पिकामुळे ही घट भरून काढता येते. बाजारात काही शेतमालाच्या किमतीत घट झाली, तरी अन्य पिकामुळे एकूण उत्पादनातील नफा-तोट्याचे गणित साधता येते. शिवाय या पद्धतीमुळे किडरोगाचा प्रादुर्भावही कमी होतो. योग्य नियोजनातून चांगले उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे एकाच प्रकारचे उत्पादन घेण्यापेक्षा मिश्रशेतीला शेतकºयांनी प्राधान्य दिले पाहिजे.मागील तीन ते चार वर्षांपासून प्रायोगिक तत्त्वावर हे सुरू केले. त्यामुळे मागणीनुसार लागवडीचे नियोजन करताना अडीच एकरात पन्नासपेक्षा अधिक प्रकारचे शेती उत्पादन घेण्याचे ठरले.
उत्पादित मालाची मागणी आणि पुरवठ्यातील व्यवस्थापनाचे तंत्र कोणते?
मला शेतीची प्रचंड आवड असून तो माझा छंद असल्याने कामाचा थकवा कधी जाणवत नाही. त्यामुळे रोपाच्या नर्सरीपासून ते जमिनीची मशागत, मजूर आणि खत व पाण्याचे व्यवस्थापन स्वत: करतो. ठराविक ग्राहकवर्ग निर्माण झाल्याने उत्पादित माल त्यांना घरपोच पोहचविण्याची युक्ती लढवली. सोशल मीडियाच्या माध्यमातून मागणी आणि पुरवठ्याचे वेळापत्रक तयार करून प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यास फायदेशीर झाले आहे. त्याला ग्राहकांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.